कऱ्हाड : वीजबिल थकल्यामुळे महावितरणने कऱ्हाड तालुक्यातील तब्बल पन्नास गावांमधील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे संबंधित गावे अंधारात चाचपडत आहेत. गत काही दिवसांपासून टप्प्याटप्प्याने हा वीज तोडणी कार्यक्रम महावितरणकडून राबविला जात असून, गावागावातून यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, शासनाने ताबडतोब वीजबिले भरून पथदिवे सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुक्यातील सुपने, वसंतगडसह विविध गावांमधील सरपंच, उपसरपंचांनी पंचायत समिती सभापती प्रणव ताटे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
कऱ्हाड तालुक्यातील वीज तोडलेल्या गावांमधील सरपंच, उपसरपंचांनी शुक्रवारी सभापती प्रणव ताटे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. यावेळी शिवाजी पाटील, वसंतगडचे उपसरपंच अॅड. अमित नलवडे, पाडळीतील बाबासाहेब कळके, तांबवेचे माजी सरपंच जावेद मुल्ला, माजी उपसरपंच रवी ताठे, पश्चिम सुपनेचे उपसरपंच अर्जुन कळंबे उपस्थित होते.
सरपंच व उपसरपंचांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचे कोट्यवधीचे वीजबिल थकल्याने महावितरणने गावोगावी पथदिव्यांची वीज तोडली आहे. वास्तविक ही वीजबिले शासनाकडून भरली जातात. तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांकडून दिवाबत्ती कर रितसर वसूल केला जातो. असे असताना शासनाच्या अन्यायी कारभारामुळे गावोगावी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शासनाने याआधीही ‘लॉकडाऊन’ काळातील वीजबिले माफ करण्याचे आश्वासन न पाळता घरगुती, व्यवसाय, उद्योग यांची वीज कनेक्शन तोडून कोरोनाच्या भयाण काळातही सामान्यांवर अन्याय केला आहे. आता ग्रामपंचायतींना विकासकामांच्या निधीतून बिले भरण्याचा अन्यायी आदेश काढल्याने त्याचा ग्रामीण विकासावर परिणाम होणार आहे.