खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी प्रमुख पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. सर्वच पक्षांसह इच्छुकांनी शेकडोने अर्ज दाखल केल्यामुळे रणांगणात भाऊगर्दी झाली आहे. प्रमुख पक्षांकडून मातब्बरांनी अर्ज दाखल केल्याने खंडाळ्याच्या कुरुक्षेत्रावरील लढतीत चुरस निर्माण झाली आहे. खंडाळा नगरपंचायतीच्या १७ प्रभागांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना या प्रमुख पक्षांसह अपक्षांनीही दंड थोपाटले आहेत. ऐनवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राजकीय पटलावरील हालचाली गतिमान करीत बिनीचे शिलेदार नगरपंचायतीच्या रणसंग्रामात पुढे केले आहेत. याशिवाय पहिल्याच नगरपंचायतीच्या नगरसेवकांच्या यादीत आपली वर्णी लागावी, यासाठी पक्षांकडे अनेकांनी मागणी करून पेच निर्माण केला आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांना बंडाळीचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे. पक्षांच्या यादीत ऐनवेळी कोणाची वर्णी लागतेय, हे छाननीनंतरच स्पष्ट होणार आहे. काँगे्रसचे ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे व पंचायत समितीचे सदस्य अनिरुद्ध गाढवे यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षे काँगे्रसने खंडाळ्याचा गड कायम आपल्या ताब्यात राखण्यात यश मिळविले आहे. मात्र, प्रत्येक वेळी निकराची झुंज देऊनही काही जागांवरच समाधान मानावे लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाने यावेळी आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व अॅड. शामराव गाढवे, प्रा. भरत गाढवे, शिवाजीराव खंडागळे, सुधाकर खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीच्या रणसंग्रामात काँग्रेसच्या बुरुजाला हात घालून बालेकिल्ला ढासळण्यासाठी मोठी बांधणी केली आहे. काँग्रेसच्या चिरेबंद तटबंदीला तडा घालविण्यासाठी मात्र विरोधकांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे. त्यातच कित्येक वर्षे काँग्रेसची धुरा सांभाळणारे अभिजित खंडागळे यांनी सवता सुभा मांडत भाजपाचे कमळ फुलविण्याचा चंग बांधला आहे. तर शिवसेनेच्या धनुष्याचा अचूक निशाणा साधण्यासाठी शहरप्रमुख मंगेश खंडागळे प्रयत्नशील आहेत. खंडाळ्यातील भाजपाचे स्वतंत्र पॅनेल उभे राहिल्यास सत्ताधारी गटाला अडचणी ठरणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून सतर्कता बाळगली जात आहे. तर राष्ट्रवादीने तरुणांची दमदार फळी पुढे करून असाध्य ते साध्य करण्याचा चंग बांधल्याने रंणागण भलतेच तापले आहे. प्रभागवार मातब्बरांनी अर्ज दाखल करून मैदानात उडी घेतली आहे. यामध्ये प्रभाग १ मधून दयानंद खंडागळे, सचिन खंडागळे, मंगेश खंडागळे, प्रभाग २ मधून स्वाती खंडागळे, शोभा गाढवे, रोहिणी गाढवे, प्रभाग ३ मधून धनश्री जाधव, भाग्यश्री वळकुंदे, प्रभाग ४ मधून शारदा खंडागळे, कल्पना गाढवे, प्रभाग ५ मधून उज्ज्वला गाढवे, संगीता राऊत, सरिता गाढवे, प्रभाग ६ मधून विजेता संकपाळ, प्रवीण संकपाळ, प्रभाग ७ मधून ज्योत्स्ना गाढवे, जयश्री गाढवे, संचिता जाधव, प्रभाग ८ मधून लताताई नरुटे, हेमलता ठोंबरे, प्रभाग ९ मधून गोविंद गाढवे, अशोक गाढवे, दत्तात्रय गाढवे, प्रभाग १० मधून अभिजित खंडागळे, बाळासाहेब गाढवे, प्रल्हाद खंडागळे, मंगेश खंडागळे, प्रभाग ११ मधून विद्याधर गायकवाड, नीलेश गायकवाड, पंकज गायकवाड, रत्नकांत भोसले, प्रभाग १२ मधून जावेद पठाण, हणमंत पवार, साजिद मुल्ला, महादेव चव्हाण, प्रभाग १३ मधून भाऊसाहेब गाढवे, प्रशांत गाढवे, केतन देशमुख, युवराज गाढवे, जितेंद्र गाढवे, प्रभाग १४ मधून शैलेश गाढवे, दत्तात्रय गाढवे, अनिरुद्ध गाढवे, प्रभाग १५ मधून अश्विनी शिंदे, उज्ज्वला संकपाळ, लता आवटे, प्रभाग १६ मधून सुप्रिया गुरव, सुप्रिया वळकुंदे, दीपाली चव्हाण व प्रभाग १७ मधून बापूराव बरकडे, संतोष बावकर, शरद दोशी, सतीश गोवेकर या प्रमुखांनी अर्ज दाखल केले आहेत. (प्रतिनिधी) सेना-भाजपाच्या युतीची चर्चा निवडणुकीत भाजपाने १३ जागी शिवसेनेने ५ जागी तर रिपब्लिकन पक्षाने ३ जागी अर्ज दाखल केले आहेत. या त्रयींची युती होण्याची शक्यता आहे. पक्षीय पातळीवर त्यासाठी हालचाली सुरू आहेत. पक्षांतर्गत खळबळ खंडाळ्याच्या राजकारणात गेली अनेक वर्षे काँग्रेसची धुरा सांभाळणारे आणि राजकारणावर मोठा पगडा असणारे अशोक गाढवे व दयानंद खंडागळे यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून अर्ज दाखल केल्याने राजकीय पटलावर खळबळजनक चर्चा रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादीच्या गळाला आणखी कोण लागणार, याकडेही खंडाळकरांच्या नजरा लागल्या आहेत.
मातब्बरांच्या लढतीने चुरस...
By admin | Published: October 30, 2016 11:18 PM