कऱ्हाड : गेले आठवडाभर शहरात पाऊस पडत आहे. पावसाचे पाणी साचून डास उत्पत्ती होऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. नगरपालिकाही ‘फाइट द बाइट’ हे अभियान राबवत असल्याची माहिती आरोग्य सभापती विजय वाटेगावकर व मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.
कोरोना संकटाचा मुकाबला नगरपालिका करत आहे. त्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यातच अवकाळी पावसास प्रारंभ झाला आहे. पावसाचे पाणी घराच्या परिसरात साचून राहाते. यात डेंग्यू, चिकन गुनिया, मलेरिया यांसारखे आजार पसरवणारे डास वाढतात. त्यामुळे पालिकेने डासांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.
धूर फवारणी, औषध फवारणी, गटारांची स्वच्छता याबरोबरच कोठेही पाणी साठवू नये, याची दक्षता नगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी घेत आहेत. मात्र नागरिकांनीही आपल्या घराच्या परिसरात असणारे पाण्याचे हौद झाकून ठेवावेत. प्लॅस्टिक वस्तू, टायर, पडीक वस्तू यात पाणी साचू देऊ नये. टेरेसवरील साहित्यातही मच्छरांची वाढ होत असते. याबाबत नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. फ्रीजमधील ट्रे कोरडे करावेत. फ्रीजच्या पाठीमागील भांड्यात पाणी साचून देऊ नये. फ्रीजच्या मागील भांड्यात डेंग्यूच्या मच्छरांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात पाणी साचू देऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.