लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शहरानजीकच्या तामजाईनगर परिसरात मारहाण आणि जबरी चोरीप्रकरणी दोन्ही गटांकडून शाहूपुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी सहाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.
याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, मनीषा आनंद नलवडे (वय ४५, रा. रुद्राक्ष टॉवर, तामजाईनगर, सातारा) या डॉक्टर असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी (दि. १७) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मनीषा यांची मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत खेळत असताना अश्विनी भाटिया हिने ‘मनीषा यांच्या मुलीशी खेळू नको,’ असे मुलीच्या मैत्रिणीला सांगितले. याची माहिती मिळाल्यानंतर मनीषा या अश्विनी हिला विचारण्यासाठी गेल्या. यावेळी अश्विनी आणि अक्षय भाटिया या दोघांनी मनीषा यांना धक्काबुक्की करीत अर्वाच्च्य शिवीगाळ केली. यानंतर पुन्हा अश्विनी आणि तिच्या सासूने मनीषा यांना चप्पलने मारहाण केली, तर अक्षयने शिवीगाळ केली. मनीषा यांना मारहाण करीतच त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे सोळा ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून घेतले. या मारहाणीत मनीषा खाली पडल्या असतानाच संजय भाटिया याने त्यांना कोयता फेकून मारला. हा कोयता त्यांच्या उजव्या पायावर लागल्यामुळे त्यांना दुखापत झाली. याप्रकरणी त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अश्विनी, संजय, अक्षय आणि अश्विनी यांची सासू (सर्व, रा. रुद्राक्ष टॉवर, तामजाईनगर, सातारा) या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करीत आहेत.
दरम्यान, याप्रकरणी अश्विनी अक्षय भाटिया (वय २३) यांनीही मनीषा आणि हर्षद नलवडे यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, गुरुवारी (दि. १८) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्या लहान बाळाला फिरविण्यासाठी इमारतीच्या पार्किंगमध्ये गेल्या असता हर्षद नलवडे याने अश्विनी यांच्या मानेवर सुरा ठेवून ‘तुझी सुपारी मिळाली आहे. तुला आणि तुझ्या फॅमिलीला दोन दिवसांत मारून टाकेन,’ असे धमकावत असतानाच तिथे अश्विनी यांचे पती अक्षय आले आणि त्यांनी अश्विनी यांना घरी जाण्यास सांगितले. त्यानंतरही हर्षद याने ‘तुझ्या मर्डरची सुपारी आहे,’ असे म्हणून तिथून निघून गेला. यानंतर मनीषा नलवडे हिने अश्विनी यांना शिवीगाळ करीत दमदाटीही केली. याप्रकरणी अश्विनी यांनी शुक्रवारी (दि. १९) शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हर्षद नलवडे, मनीषा नलवडे या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.