सातारा : राज्यातील भाजपचे नेते जाणीवपूर्वक स्थानिक गावगुंड मोदींबाबत केलेल्या वक्तव्याशी पंतप्रधानांचा संबंध जोडून पंतप्रधान पदाचा अपमान करत आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे. असत्य कथन करून लोकांची दिशाभूल करणे, पंतप्रधान पदाचा अवमान करणे, हा दखलपात्र गुन्हा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजपकडून जाणीवपूर्वक अवमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काँग्रेसतर्फे शहर पोलिसांकडे करण्यात आली आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांच्याविरोधात भारतीय जनता पार्टीचा निषेध करण्यात आला.
पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले हे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात असताना भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी मोदी नावाच्या स्थानिक गुन्ह्याबाबत यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. यावेळी नागरिकांशी बोलत असताना प्रांताध्यक्ष स्थानिक गुंड मोदीला आपण शिव्या देऊ शकतो, मारू शकतो असे म्हटले होते.मात्र या घटनेचा व्हिडीओ वायरल करून त्याचा पंतप्रधान मोदींशी संबंध जोडत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. याबाबतीत प्रांताध्यक्ष यांनी स्पष्टपणे खुलासा करून आपण स्थानिक गुन्हे मोदी बोलत होतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत नाही, असे सांगूनही वारंवार भाजपचे कार्यकर्ते पंतप्रधानांचा अवमान होईल, असे वक्तव्य करत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस नरेश देसाई, शहराध्यक्ष रजनीताई पवार, अनु. जाती-जमातीचे अध्यक्ष मनोजकुमार तपासे, सुषमाराजे घोरपडे, रफिक शेठ बागवान, अनवर पशाखान, संभाजी उत्तेकर, सर्जेराव पाटील आदी कार्यकर्ते यांनी आज सातारा शहर पोलीस स्टेशनला जाऊन भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.