सातारा : ‘जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू आहे. या लसीकरणावेळी कोणाचा अनावश्यक हस्तक्षेप होत असेल तर आरोग्य विभागाने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा,’ अशी सूचना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी केली. तसेच अतिवृष्टीत बंद पडलेले रस्ते तातडीने सुरू करण्याबाबत कार्यवाही करावी, असेही त्यांनी बांधकाम विभागाच्या सभेत स्पष्ट केले.
सातारा जिल्हा परिषदेत आरोग्य आणि बांधकाम समितीची मासिक सभा उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला डॉ. अभय तावरे, बापुराव जाधव, दत्ता अनपट, राजाभाऊ जगदाळे आदींसह दोन्ही विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला मागील सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात आला. तसेच मागे झालेल्या ठरावावरील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. आरोग्य समिती सभेत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोरोना लसीकरणात विनाकारण काही लोक अडथळा आणतात. त्यामुळे लसीकरण करावे की नको, अशी मानसिकता झाल्याचे सांगितले. यावर उपाध्यक्ष विधाते यांनी लसीकरणावेळी विनाकारण कोणाचा हस्तक्षेप होत असेल, तर तत्काळ संबंधित व्यक्तींवर पोलिसांत तक्रार द्या. त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा.
जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन अनेक गावांत भूस्खलन झाले. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. अशा भूस्खलन झालेल्या गावांत कोरोना लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे. आरोग्य विभागाने शिबिरे लावून तेथील लोकांची काळजी घ्यावी, अशी सूचनाही उपाध्यक्ष विधाते यांनी सभेत केली.
चौकट :
रस्त्यांसाठी आपत्कालीनमधून निधी...
बांधकाम समितीच्या सभेत अतिवृष्टीमुळे रस्ता नुकसानीचा आढावा घेण्यात आला. रस्ते वाहून जाणे, दरडी पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने तात्पुरती डागडुजी करून रस्ते सुरू करावेत. त्यानंतर कायमस्वरूपी काम करण्यात येईल. तसेच रस्त्यांच्या कामांसाठी आपत्कालीनमधूनही तातडीने निधी देण्यात येईल, असेही उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी स्पष्टपणे सांगितले.
.........................................................