सातारा आणि सांगली जिल्ह्यात कार्यक्षेत्र असणाऱ्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सध्या उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, २ जूनला सकाळी ११ वाजल्यापासून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्जांची छाननी होणार आहे. ३ ते १७ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत असून, १८ जूनला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. तर २९ जूनला मतदान होणार आहे.
सोमवारी दिवसभरात ११४ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आणि जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे नेते डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांच्यासह सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष लिंबाजीराव पाटील, जितेंद्र पाटील, कृष्णा कारखान्याचे विद्यमान संचालक दयानंद पाटील, नेर्लेचे माजी सरपंच संभाजी पाटील, विद्यमान संचालक संजय पाटील, सयाजीराव यादव, उद्योगपती दत्ता देसाई यांनी अर्ज दाखल केला आहे.
अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, गतवेळी सभासदांनी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला निवडून दिले. गेल्या सहा वर्षांत आम्ही शेतकरी सभासदांना केंद्रबिंदू मानून कारभार केला आहे. उच्चांकी दर, मोफत साखर, ऊसविकास योजना यांसारखे उपक्रम यशस्वीपणे राबविले. या वेळीही शेतकरी सभासदांचा विकास हाच मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे.
- चौकट
सोमवारी दिवसभरात दाखल अर्ज
वडगाव हवेली-दुशेरे गट : १७
काले-कार्वे गट : १५
नेर्ले-तांबवे गट : १४
रेठरे हरणाक्ष-बोरगाव गट : १५
येडे मच्छिंद्र-वांगी गट : १०
रेठरे बुद्रूक-शेणोली गट : १३
अनुसुचित जाती जमाती : ७
महिला राखीव : ९
इतर मागास प्रवर्ग : १४
- चौकट
आजअखेर दाखल अर्ज
दि. २५ : ६
दि. २७ : २६
दि. २८ : ८४
दि. ३१ : ११४
फोटो : ३१केआरडी०४
कॅप्शन : रेठरे बुद्रूक (ता. कऱ्हाड) येथील कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी सोमवारी रेठरे बुद्रूक-शेणोली गटातून विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.