शिरवळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केलेल्या संचारबंदीच्या आदेशाचा भंग करीत शिरवळ येथे विनाकारण फिरत असताना आढळून आल्याने पळशी, ता. खंडाळा येथील तीनजणांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जिल्ह्यामध्ये संचारबंदीचा आदेश लागू आहे. त्यानुसार शिरवळ याठिकाणी पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू अहिरराव गस्त घालत असताना शिरवळ-शिंदेवाडी रस्त्यावर एका पेट्रोल पंपासमोर आविष्कार अनिल भरगुडे (वय २२), आदिनाथ धनाजी भरगुडे (२४), नितीन विठ्ठल भरगुडे (२४) हे विनाकारण फिरताना आढळून आले. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रशांत वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित तिघांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू अहिरराव तपास करीत आहेत.