मायणी : खटाव तालुक्यातील मायणी येथे कोरोनाच्या काळातील नियमांचे उल्लंघन करीत दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी सातजणांवर गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत मायणी पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, शासनाने पारित केलेल्या नियमाप्रमाणे मायणी येथे सध्या लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. फक्त अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या आस्थापना उघड्या ठेवण्यास परवानगी आहे. परंतु, बंद आस्थापनांत समावेश असतानाही या परिसरातील तीन पानशॉप, एक हॉटेल, मराठी शाळेजवळील एक कापड दुकान, बसस्थानकाच्या परिसरातील एक चप्पल दुकान व चावडी चौक परिसरातील एक कापड दुकान चालू असलेले आढळले. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली. वडूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी हे तपास करीत आहेत.