कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीची लगबग जोरात सुरू आहे. इच्छुकांची भाऊगर्दी नेत्यांची डोकेदुखी ठरतेय. १ जूनपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने इच्छुक नेत्यांकडे फिल्डिंग लावत आहेत. त्यावेळी ''अर्ज तर भरा, पुढचं नंतर बघू ''असा प्रेमाचा सल्ला नेते देताना दिसत आहेत. त्यामुळे इच्छुकांना तात्पुरता दिलासा मिळत असला तरी त्यांच्या मनात धाकधूक मात्र कायम आहे.
कोरोना महामारी संकटामुळे गत वर्षभर लांबलेली कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक २४ मे रोजी अधिकृत जाहीर झाली आहे. २५ मे पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. १ जूनपर्यंत त्याचा कालावधी आहे. त्यामुळे वर्षभरापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांची सध्या चांगलीच धावपळ सुरू झालेली दिसते. आपलीच उमेदवारी निश्चित झाली पाहिजे यासाठी पॅनलप्रमुखांकडे त्यांनी फिल्डिंग लावलेली दिसत आहे.
कारखाना निवडणूक दुरंगी की तिरंगी होणार? याबाबत सध्या अस्पष्टता आहे, पण प्रथमदर्शनी तर तीन पॅनल दिसत आहेत. डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनल पुन्हा रिंगणात उतरत आहे. शिवाय माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत पॅनल व अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनलही निवडणुकीसाठी सज्ज आहे. डॉ. इंद्रजित मोहिते, अविनाश मोहिते यांच्यासह त्यांच्या काही संभाव्य उमेदवारांनी उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. डॉ. सुरेश भोसले यांनी अजून स्वतःचा अर्ज दाखल केला नसला तरी त्यांच्या समर्थकांचेही काही अर्ज दाखल झाले आहेत.
डॉ. सुरेश भोसले हे सत्ताधारी असल्याने त्यांच्या सहकार पॅनलमधून इच्छुकांची गर्दी मोठी आहे. माझीच उमेदवारी निश्चित झाली पाहिजे, असा अट्टाहास धरून येणाऱ्या प्रत्येक इच्छुकावर डॉ. भोसले आपल्या पद्धतीने उपचार करीत आहेत. त्यातूनही संबंधिताने जास्त आढेवेढे घेतले तर, ‘अर्ज तर भरा, पुढचं नंतर बघू’, असा सल्ला येथे मिळत आहे.
डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते या दोघांनीही कारखाना निवडणूक स्वतंत्र लढवण्याची गत दोन अडीच वर्षांपासून तयारी केली आहे, पण कार्यक्षेत्रातील काही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दोन माजी अध्यक्ष मोहितेंच्या मनोमिलनाचे प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी मंत्री विश्वजित कदम यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठका घडवून आणल्या आहेत. आजही त्या बैठका सुरूच आहेत.
पण मनोमिलन होणार का? भोसले यांच्या विरोधात मोहित्यांचे एकच पॅनल रिंगणात उतरणार का? याबाबत उलटसुलट चर्चा आहेत. त्यामुळे रयत व संस्थापक पॅनलचे संभाव्य उमेदवार अर्ज दाखल करण्याबाबत नेत्यांना भेटायला आल्यावर त्यांच्याकडूनही ‘अर्ज तर भरा पुढचं नंतर बघू’, असंच मत ऐकायला मिळत आहे, पण अर्ज दाखल करूनही आपण अंतिम रिंगणात असू की नाही याबाबत इच्छुकांच्या मनात धाकधूक कायम आहे.
चौकट
त्यांना पुन्हा पर्याय उरणार नाही
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत सर्वच पॅनलकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. इच्छुक उमेदवारांना सुरुवातीलाच उमेदवारी मिळणार नाही असे स्पष्ट सांगितले तर संबंधित इच्छुक विरोधी पॅनलच्या संपर्कात जाण्याची भीती नेत्यांना आहे. यापूर्वी तसे अनुभवही नेत्यांनी घेतले आहेत. त्यामुळे सध्या मात्र नेते इच्छुकांना सध्या अर्ज तर भरा, १७ जूनपर्यंत अर्ज माघारीला मुदत आहे. तोपर्यंत सगळे बसून पुढचं काय करायचं ते ठरवू असे सांगत आहेत. उमेदवारी नाकारली तरी कोणाला फार चुळबुळ करता येणार नाही. आपल्याबरोबरच राहावे लागेल याची काळजी नेते घेताना दिसत आहेत.