सातारा: शहराला उरमोडी धरणातील पाणी शहापूर योजनेद्वारे आणि कास धरणातील पाणी कास पाईपलाईनद्वारे पुरविले जात होते. या दोन्ही पाईपलाईनद्वारे वेगवेगळ््या भागाला पाणीपुरवठा केला जात होता.
आता दोन्ही पाईपलाईन एकत्रित जोडल्यामुळे शहापूरचे पाणी कास पाईपलाईनद्वारे मिळणाऱ्या लोकांनाही उपलब्ध होणार आहे. या कामाची जोडणी अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी दिली.भविष्यातील पाणी टंचाई सदृश परिस्थितीचा विचार करता कास माध्यमातून पाणी पुरवठा होत असणाऱ्या भागास पर्यायी स्त्रोत उपलब्ध करणे गरजेचे आहे. त्यानुसार गुरुकुल टाकी व कात्रेवाडा टाकीवरून कास माध्यमातून पाणी वितरीत करण्यात येत आहे. त्या भागास गरज पडल्यास शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी क्रॉस कनेक्शन करण्यात आले.याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी सूचना केल्या होत्या. त्यानुसार हे काम हाती घेण्यात आले आहे. बोगदा परिसरामध्ये जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कास धरणातील पाणी पातळी यदाकदाचित आणखी खालावल्यास शहापूर योजनेतून गुरूकूल टाकी व कात्रेवाडा टाकीवरून पाणी वितरित करणे शक्य होणार आहे.
या कामाची पहणी पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, बांधकामचे माजी सभापती किशोर शिंदे, अभियंता दीपक राऊत आदींनी केली. क्रॉस कनेक्शनचे काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने चाचणी घेण्याच्या सूचना पालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.