कोरेगाव : सातारा-कोरेगाव रस्त्यावर कृष्णानगरच्या कालव्यावरील पुलाजवळ दिशादर्शक फलक नसल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द करताच खेडचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष युवराज जाधव व शोभा शिंदे यांनी स्वत: पुढाकार घेत मोठा दिशादर्शक फलक उभारला आहे. या फलकामुळे आता मातीचा भराव दिसत नाही. परिणामी वाहनधारक आपोआप वळण घेऊन पुढे मार्गक्रमण करत आहेत.
सातारा-कोरेगाव रस्त्यावर पोवईनाका ते संगम माहुलीदरम्यान चौपदरीकरण करण्यात आले आहे. कृष्णानगर कालव्यानजिक नव्याने पुलाची उभारणी न झाल्याने जुन्याच पुलावरुन वाहतूक सुरु असून पुलाच्या अलिकडे दिशादर्शक फलक नाही. त्यामुळे दररोज अनेक वाहने थेट कालव्यातच उडी घेत होती.
रात्रीच्या वेळी अपघाताच्या संख्येमध्ये वाढ झाल्याने संगमनगर पोलिस दूरक्षेत्राचे कर्मचारी आणि पीसीआर मोबाईलवरील पोलिस कर्मचाºयांची धावाधाव होत होती.
केंद्र सरकारने सातारा-लातूर राष्टÑीय महामार्गाची अधिसूचना काढली असल्याने हा रस्ता आपोआप त्यांच्याकडे वर्ग झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या महिन्यापासून या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे. मात्र, त्याकडे ठेकेदारांनी पाठ फिरवली आहे. सरकारच्या धोरणांचा परिणाम असल्याने ठेकेदार निविदा भरत नाहीत.
त्यामुळे आता बांधकाम विभाग दुहेरी फेºयात अडकला होता. याबाबत ‘लोकमत’ने सचित्र वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत खेडचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष युवराज जाधव व शोभा शिंदे यांनी स्वत: पुढाकार घेऊन भला मोठा दिशादर्शक फलक उभारला आहे. या फलकामुळे आता मातीचा भराव दिसत नाही. वाहनधारक आपोआप वळण घेऊन पुढे मार्गक्रमण करत आहेत. दिशादर्शक फलकामुळे पोलिसांनी टाकला सुटकेचा निश्वास...युवराज जाधव व शोभा शिंदे यांनी स्वखर्चातून दिशादर्शक फलक उभारल्यामुळे वाहनधारकांमध्ये जागृती होत आहे. अपघात टळले आहेत. या फलकामुळे आता अपघात होणार नाहीत. संगमनगर पोलिस दूरक्षेत्राच्या कर्मचाºयांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.