म्हसवड : ‘तारळी योजनेचे पाणी जांभुळणी, वरकुटे मलवडीसह परिसरात खळाळल्याने या परिसराचे स्वप्न साकार झाले आहे. पाणी आल्याने ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले असून, जांभुळणी, वरकुटे मलवडीसह पंचक्रोशीतील बनगरवाडी, महाबळेश्वरवाडी, कुरणेवाडी या गावांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे,’ अशी भावना माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केली.
बनगरवाडी येथे तारळी योजनेच्या पाण्याचे पूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मनोज पोळ, युवक राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस अभय जगताप, विक्रम शिंगाडे, देवापूरचे सरपंच शहाजी बाबर, महाबळेश्वरवाडीचे सरपंच विजय जगताप, ॲड. सिद्धेश्वर काळेल, सरपंच रामभाऊ झिमल, माजी सरपंच संजय खिलारे, संजय जगताप, बाबाराजे हुलगे, सुभाष काळेल, सतीश जगताप, पै. विशाल जाधव, धीरज जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, ‘या भागावर सातत्याने अन्याय होत राहिला आहे; परंतु या भागातील भोजलिंग पाणी संघर्ष चळवळ समितीने आपला लढा सुरूच ठेवला. सातत्यपूर्ण प्रयत्न व संघर्षपूर्ण लढ्याला शेवटी यश आले आहे. महाविकास आघाडी सरकारने या दुष्काळी भागातील जनतेला पाणी देण्याचा महत्त्वपूर्ण व सकारात्मक निर्णय घेतला. जलसंपदामंत्री जयंत पाटील, सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, माजी मंत्री महादेव जानकर, आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे या सर्वांच्या माध्यमातून या भागाचा शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
१२बनगरवाडी
फोटो - बनगरवाडी, ता. माण : तारळी योजनेच्या पाण्याचे पूजन करताना प्रभाकर देशमुख, मनोज पोळ, अभय जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.