सातारा : येथील कोरेगाव रस्त्यावरील विसावा नाका परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून, अनेक अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. परंतु, या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या सुमारे १२० वर्षांपूर्वीच्या पिंपळाच्या झाडालाही अखेरचा निरोप देण्यात आला आहे. काही नागरिकांनी हा वृक्ष वाचविण्यासाठी शपथ घेतली; पण त्यांच्या या मागणीला वाटाण्याच्या अक्षता दाखविण्यात आल्या. या वृक्षाची कत्तल झाल्याने वृक्षप्रेमी व नागरिकांत मोठी नाराजी दिसून येत आहे.येथील सातारा-कोरेगाव रस्त्यावर जिल्हा परिषदेच्या पुढे विसावा नाका परिसर आहे. येथील रस्ता रुंदीकरणाचे काम मागील एक महिन्यापासून सुरू आहे. त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंची अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. त्यानंतर रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. मात्र, या रस्त्याचे रुंदीकरण सुरू असताना बाजूचा सुमारे १२० वर्षांचा पिंपळाचा वृक्ष अडचणीचा ठरत होता. त्याशिवाय रस्त्याचे रुंदीकरण करता येणार नव्हते. त्यामुळे पिंपळाचा वृक्ष तोडण्याची शक्यता व्यक्त होत होती. त्यावेळी येथील काही नागरिकांनी हा वृक्ष वाचविण्यासाठी जवळपास १५० सह्यांचे निवेदन बांधकाम विभागाला दिले. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू; पण झाड वाचवू, असा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर पिंपळ वाचविण्यासाठी अनेकांना निवेदनेही दिली. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता पिंपळाचे हा वृक्ष तोडण्यात आला आहे. (प्रतिनिधी)सातारकरांकडून नाराजी व्यक्त...झाडाच्या जागेवर भुयारी गटारीचे काम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. झाड वाचवायचे असते, तर गटार बाजूने वळवून नेता आले असते; परंतु तसे न करता झाड तोडण्यात आले. शतकाचा इतिहास असणारा वृक्ष तोडल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
अखेर शतकोत्तर वृक्षाने घेतला निरोप...
By admin | Published: February 04, 2015 10:37 PM