शेखर जाधव ल्ल वडूज विधानसभा मतदार संघात खटाव तालुक्याचे त्रिभाजन झाल्यामुळे पंचायत समिती पदाच्या या निवडी करताना अनेक वेळा पक्षश्रेष्ठींना अडचणींना सामारे जावे लागते. हा इतिहास आहे. परंतु पक्षश्रेष्ठींचा आदेश मानून सर्वच सदस्यांनी सभापतिपदी संदीप साळुंखे ऊर्फ पिंटू पैलवान यांना संधी दिली. तर उपसभापतिपदी कैलास घाडगे यांना न्याय मिळाला. हे दोघेही पंचायत समितीला गत निवडणुकीत पराभवाला सामारे गेले होते. पराभवाने खचून न जाता या दोघांनी ही पक्ष संघटना मजबूत करीत आजअखेर कार्यरत राहिले. त्याचेच फलित म्हणून अखेर त्यांना पंचायत समितीतील उच्चपदे मिळाल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्याला अखेर न्याय मिळाला, अशाच प्रतिक्रिया तालुक्यातून उमटत आहेत.सर्वसामान्य कुटुंबातील व शेतकऱ्याचं पोर म्हणून संदीप साळुंखे यांची ओळख प्रारंभी होती. सातारा तालीम संघाच्या माध्यमातून कुस्ती जिवंत ठेवून त्यांनी जिल्ह्यात स्वत:ची नव्याने ओळख निर्माण केली. मात्र, नागाचे कुमठे गावाची ओळख राज्यभर महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे यांच्यामुळे निर्माण झाली. या गावात तसे अनेक व्यक्ती विविध क्षेत्रांत कार्यरत असून, तालुक्यात व तालुक्याबाहेर सामाजिक वसा जोपासत आहेत. शांत, संयमी आणि वैचारिक बैठक असणारे हे गाव लोकसंख्येच्या मानाने छोटेखानी जरी असले तरी येथील विचारसरणी सामाजिक कार्यात महान असल्याचे कितीतरी उदाहरणे आहेत. प्रारंभी वडूज गटात असणारे हे गाव सध्याच्या औंध गणात नव्याने समाविष्ट झाले. या गणात औंधसह मोठा मतदार असणारी अनेक गावे होती. परंतु गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी पूर्ण गटाचा सखोल अभ्यास करून औंध गणातून छोट्या गावातील उमेदवारी का दिली? याचा उलगडा आता तालुक्याला झाला आहे. खटाव पंचायत समिती सभापती पदावर सुयोग्य व्यक्तीच विराजमान होणे पक्षाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे होते. त्यातच माजी आमदार प्रभाकर घार्गे यांची चाणाक्ष नजर या निवडीमुळे राष्ट्रवादी पक्षाला तारुण नेणारी ठरली.विकासकामे कशी खेचून आणायचे कसब आणि कला काही मोजक्या मुशीतील कार्यकर्त्यांकडेच असते. त्याचे मूर्तीमंत उदाहरण ठराविक मतदार संघातच पाहावयास मिळते. स्वत:च्या हिम्मतीवर आणि कार्यक्षमतेवर प्रचंड सकारात्मक आत्मविश्वास असणारे संदीप साळुंखे (मांडवे) ऊर्फ पिंटू पैलवान आणि कैलास घाडगे हे राष्ट्रवादीच्या पक्ष संघटनेतील तळागाळातील वास्तावातील कार्यकर्ते आहेत. सभापती पद हे माण विधानसभा मतदार संघात तर उपसभापती पद कोरेगाव मतदार संघात देऊन पक्षाने समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडीमुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्ष अजून बळकट होईल, यात तिळमात्र शंका नाही. या पदाचा पुरेपूर फायदा दोन्ही मतदार संघात पक्षाला निश्चित होईल. खटाव तालुक्याचे राजकीयदृष्ट्या झालेल्या त्रिभाजनामुळे विकासापासून हा तालुका मागे पडला. त्यातील मुख्य कारण दुजाभाव असून, त्या कारणांचा तालुक्यातील नेते मंडळींनी उहापोह करणे काळाची गरज आहे. मात्र, या विवंचनेत न अडकता कार्यरत असणारे अनेक स्थानिक नेतेमंडळी आपापल्या परिसरात विकासकामे खेचून आणत आहेत. खटाव (वडूज) पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी पक्षाने एकहाती सत्ता घेतली आहे. तळागाळात कार्यरत असणारे पिंटू पैलवान पंचायत समितीला औंध गणातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. या गटातील जिल्हा परिषद उमेदवाराला निवडून आणण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. युवकांचा आयडॉल म्हणून त्यांची ओळख असून, पंचायत समिती सभापतिपदी त्यांची निवड तरुणांच्या मतांची बेरीज पक्षाला होणार आहे. सभापतिपदी नवीन चेहरा तालुक्याला लाभल्याने पक्षाला राजकीय फायदा मिळू शकतो.
अखेर पैलवानाला न्याय मिळाला..!
By admin | Published: March 15, 2017 10:56 PM