आदर्की : तालुक्याचे ठिकाण जवळच्या अंतराने जोडण्यासाठी १९७२ मध्ये दिवंगत चिमणराव कदम यांनी सालपे-सासवड-नांदल रस्त्याचे काम रोजगार
हमी योजनेतून केले होते. त्यानंतर रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पावसाळ्यात रस्ता बंद होत असे. विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्या प्रयत्नातून व जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट यांच्या पाठपुराव्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण झाले. यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातून फलटण जाण्यासाठी आदर्की-फलटण व लोणंद-फलटण हे दोन मुख्य रस्ते आहेत. परंतु सालपे, शेरेचीवाडी, तांबवे, चांभारवाडी, आरडगाव, हिंगणगाव, सासवड, टाकोबाईचीवाडी, नांदल या गावांना वेळ व पैसा घालून पंचवीस ते तीस किलोमीटर फलटण पडत
होते. त्यासाठी पर्यायी मार्ग सालपे-हिंगणगाव-सासवड, नांदल, तांबमाळ- फलटण या रस्त्यापैकी सालपे- सासवडपर्यंत कच्चा रस्ता होता. १९७२च्या दुष्काळात दिवंगत चिमणराव कदम यांनी रोजगार हमी योजनेतून सासवड-नांदल, सासवड-मुळीकवाडी रस्त्याचे मुरमीकरण, खडीकरण करण्यात आले. त्यानंतर या रस्त्यावरून विद्यार्थी, प्रवाशी, खासगी वाहतूक, एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्या; पण पावसाळ्यात माळी बेंद ते सासवडपर्यंत चिखल होत असे. त्यामुळे एसटीबरोबर प्रवाशी वाहतूक बंद होत होती. त्यानंतर या ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले. गतवर्षी नांदल फाटा ते सासवडपर्यंत अंदाजे अडीच कोटी रुपयाला विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आले. त्यानंतर मुरमीकरण, खडीकरण, रुंदीकरण, डांबरीकरण करण्यात आले.
चौकट
सासवड ते नांदल फाट्यापर्यंत रस्ता अरुंद व पाणथळ असल्याने पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद होत होता. शेतकऱ्यांना शेतात जावेच लागत होते. त्यावेळी गाड्या घसरून अपघात झाले आहेत. आता रस्ताचे डांबरीकरण झाल्याने प्रवाशी, विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.