सातारा : नूतनीकरणामुळे तब्बल वर्षभरापासून बंद असलेले साताऱ्यातील शाहू कलामंदिर अखेर शुक्रवारी रंगकर्मींसाठी खुले झाले. तसेच ऐतिहासिक कमानी हौदातून तब्बल दहा ट्रॅक्टर गाळ काढून येथील कारंजेही पुन्हा सुरू करण्यात आले. खासदार उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी ही कामे मार्गी लावली.
सातारकरांना दर्जेदार नाट्याची अनुभूती देणाऱ्या शाहू कलामंदिराच्या नूतनीकरणाचे काम पालिकेकडून सुरू होते. त्यामुळे वर्षभरापासून हे कलादालन बंद होते. खासदार उदयनराजे भोसले यांनी हे कलादालन तातडीने सुरू करावे, अशा सूचना उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना केल्या होत्या. त्यानुसार गेल्या पंधरा दिवसांपासून येथील प्रलंबित कामांनी गती घेतली. शिवजयंतीच्या मुहूर्तावर शाहू कलामंदिर सुरू झाल्याने अभिनेते प्रशांत दामले व कविता लाड अभिनित एका नाटकाचा आनंद रसिकांनी लुटला.
दरम्यान, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून गाळाने भरलेला ऐतिहासिक कमानी, हौद स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गाळमुक्त केला. या हौदातून सुमारे दहा ट्रॅक्टर गाळ बाहेर काढून येथील रंगीबेरंगी कारंजे सुरू करण्यात आले. अनेक वर्षांनंतर कारंजे सुरू झाल्याने सातारकरांनी समाधान व्यक्त केले.