सातारा : वाळूच्या वाहनांवर नाहक कारवाई करू नये म्हणून १५ हजारांची लाच स्वीकारताना शनिवारी कोरेगाव तहसील कार्यालयाच्या आवारात रंगेहात पकडण्यात आलेल्या तीन संशयितांची घरझडती लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे रविवारी घेण्यात आली. दरम्यान, लाचखोरीच्या साखळीत आणखी काहीजण असण्याची शक्यता व्यक्त होत असून, जाळ्यात सापडलेल्या तलाठी व दोन लिपिकांनी त्यासंदर्भात दिलेल्या माहितीत विसंगती दिसून येत आहे.कोरेगाव तहसील कार्यालयातील लिपिक हणमंत अर्जुन सानप (वय ३०, मूळ रा. पडळ, ता. खटाव, सध्या रा. सुभाषनगर-कोरेगाव), प्रवीण अशोक फुके (२६, मूळ रा. बुरंगवाडी, ता. पलूस, जि. सांगली, सध्या रा. जुनी पेठ, कोरेगाव) आणि जळगाव सजाचा तलाठी अरविंद हरिश्चंद्र घुगे (३९, मूळ रा. भालगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर, सध्या रा. सुभाषनगर-कोरेगाव) या तिघांना शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून पंधरा हजारांची लाच घेताना पकडले होते. रात्री उशिरापर्यंत कारवाई आणि संशयितांकडून माहिती घेण्याचे काम सुरू होते. त्यानंतर कोरेगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.प्राप्त माहितीनुसार, लिपिक फुके याने वाळू व्यावसायिकाकडून लाचेची मागणी केली होती, तर ही रक्कम तलाठी घुगे याने स्वीकारली. दरम्यान, वाळू व्यावसायकांविरुद्ध संभाव्य कारवाई टाळण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्यांच्या साखळीत आणखी काहीजण सहभागी आहेत का, याविषयी संशयितांकडे तपास करण्यात आला. आणखी दोघेजण अशा कृत्यांमध्ये सहभागी होत असावेत, अशी शक्यता असल्याचे स्पष्ट होत असले तरी याबाबत निश्चित माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडलेल्या तीनही संशयितांच्या घरांची झडती घेण्याचे काम सुरू झाले आहे; मात्र रविवारी रात्रीपर्यंत त्याबाबत तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
कोरेगाव लाचखोरीतील संशयितांच्या घरांची झडती
By admin | Published: September 20, 2015 10:56 PM