खंडाळा : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी गावोगावी प्रशासनाकडून पुन्हा खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा प्रसार पुन्हा हळूहळू वाढत आहे. नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी खंडाळा शहरात भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. या भरारी पथकाच्या माध्यमातून चार दिवसांत सुमारे पाऊण लाखाची वसुली केली आहे.
कोरोनाच्या भीषण वास्तवाशी सामना करताना ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी व गावात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी लोकांवर नजर ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने भरारी पथकांची निर्मिती केली आहे. खंडाळा शहरात नगरपंचायत व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विनामास्क फिरणाऱ्या नागरिक व वाहनचालकांवर कडक कारवाई केली जात आहे.
खंडाळा शहरात पोलीस निरीक्षक महेश इंगळे व मुख्याधिकारी योगेश डोके यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक लोकांवर नजर ठेवून विनामास्क फिरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली जात आहे.
चौकट :
गर्दी टाळण्याचे आवाहन
खंडाळा शहरात बाजारपेठेत आसपासच्या गावातील नागरिकांची मोठी गर्दी असते. त्यांनी कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून आरोग्याची काळजी घ्यावी तसेच विनाकारण शहरात फिरू नये, जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने दिलेल्या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.