महाबळेश्वर : महाबळेश्वर, पाचगणीत शनिवार, रविवारी नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेलचालक तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी व पोलीस यांच्यासोबत कारवाई केली. दोन दिवसांत तब्बल ३ लाख ४८ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला.
महाबळेश्वर तालुका कोरोनाच्या संसर्गामुळे पर्यटनासाठी बंद ठेवला होता. गेल्या तीन महिन्यांपासून येथील व्यवसाय संपूर्णपणे बंद होते. उन्हाळी हंगामातील महत्त्वपूर्ण हंगाम तोट्यात गेला. त्यामुळे येथील व्यावसायिकांचा आर्थिक कणा मोडला आहे. अधिकाऱ्यांच्या परवानगीने व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तालुक्यातील हॅाटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. परवानगी देताना काही अटींची पूर्तता करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या वतीने प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर यांनी स्वतः वन विभागाच्या सभागृहामध्ये बैठक घेऊन हॅाटेल व्यवसाय सुरू करताना नियमांची पूर्तता करण्याबाबत सूचना केल्या होत्या. परंतु अनेक व्यावसायिकांनी व्यवसाय सुरु केले, परंतु नियमांबाबत दुर्लक्ष केले.
यामुळे तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील, पाचगणीच्या मुख्याधिकारी व पोलिस खात्याच्या संयुक्त मदतीने पथक करून विविध हॅाटेल्सवर तपासणी केली. शनिवार, रविवार असल्याने येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. अनेक हॅाटेलमधील कर्मचाऱ्यांच्या अद्याप कोरोनाच्या अनुषंगाने तपासण्या झाल्या नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी दंड ठोठावला. या वेळी विनामास्क फिरणाऱ्या ६४ जणांकडून ३९ हजार ८००, सामाजिक अंतर न पाळणाऱ्या ८४ जणांकडून ४२ हजार, ३१ जणांकडून १३ हजार ४००, १६ हॅाटेल व्यावसायिकांकडून २ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. यामध्ये तहसीलदार पाटील यांनी मेटगुताड येथील केवळ हॅाटेलांवर कारवाई करून १ लाख ४४ हजार रुपयांचा दंड वसूल केला. यामुळे तालुक्यातील व्यावसायिकांनी त्वरित प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने अटींच्या पूर्ततेसाठी पळापळ सुरु केली आहे.
चौकट
कर्मचाऱ्यांच्या तपासण्या, लसीकरणाकडे दुर्लक्ष
सर्व हॅाटेल व्यावसायिकांना हॅाटेल सुरू करण्यासाठी कोरोनाच्या नियम पाळण्याच्या सूचना वारंवार करूनही दुर्लक्ष होत असल्याने ही कारवाई करणे भाग पडले. अनेक हॅाटेल व्यावसायिकांनी अद्याप कर्मचाऱ्यांच्या तपासण्या किंवा लसीकरण केलेले नाही. केवळ नियम म्हणून नाही तर सामाजिक भान व जबाबदारी म्हणून सर्वांनी पाळणे अपेक्षित आहे. परंतु याबाबत कोणीच गांभीर्य दाखवत नसल्याने नाईलाजाने कारवाई करणे भाग पडले. हॅाटेल व्यावसायिकांनी आपापल्या कर्मचाऱ्यांच्या तपासण्या करून घ्याव्यात, असे आवाहन तहसीलदार पाटील यांनी केले.