मायणी : वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असतानाही रस्त्यावरील व बाजारपेठेतील गर्दी कमी होताना दिसत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कडक अंमलबजावणीचा निर्णय घेतल्यानंतर मायणी पोलिसांकडून कोरोना काळात आजअखेर विनाकारण फिरणाऱ्या व मॉर्निंग वॉक करणाऱ्यांकडून सुमारे चार लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण सातत्याने सापडत असलेल्या सातारा जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून कडक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, निर्बंध असतानाही विनाकारण रस्त्यावर, बाजारपेठेत व क्रीडांगणावर फिरणाऱ्यांची संख्याही कमी होताना दिसत नव्हती.
त्यामुळे मायणी पोलिसांनी येथील चांदणी चौक, मुख्य बसस्थानक परिसर, चितळी रोड, मायणी पोलीस दूरक्षेत्रांतर्गत येणाऱ्या विविध गावांमध्ये तसेच जिल्हा हद्दीवर कडक बंदोबस्त ठेवला आहे. या बंदोबस्तामध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाची, नागरिकांची चौकशी केली जात होती. यामध्ये योग्य कारण असणाऱ्या वाहनचालकांना व नागरिकांना थोडाफार दिलासा दिला जात आहे.
विविध प्रकारच्या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे, नाना कारंडे, बाबूराव खांडेकर, नवनाथ शिरकुळे, योगेश सूर्यवंशी, प्रवीण सानप, प्रकाश कोळी, महिंद्र खाडज या पोलीस कर्मचाऱ्यांसह वैभव सानप, जाकीर डांगे, अरुण घार्गे, महेंद्र काटकर, अमर घाडगे, अभिजीत सानप, अशोक जाधव, किरण माळी या होमगार्डनी सहभाग घेतला.
कोट..
मात्र, विनाकारण फिरणारे, बंदी असतानाही एकत्र येऊन कार्यक्रम साजरे करणारे तसेच मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने क्रीडांगणावर गर्दी करणाऱ्या नागरिकांवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने कारवाई करून सुमारे चार लाख रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी दिली.
- शहाजी गोसावी, पोलीस उपनिरीक्षक, मायणी
१० मायणी
मायणी पोलीस दूरक्षेत्रामधील अनेक भागात असे तपास पथके तैनात करण्यात आले होते. (छाया :संदीप कुंभार)