दहीवडी : वरकुटे मलवडी येथे पाचट पेटवल्यानंतर लावली गेलेली आग वनक्षेत्रात पसरली. यामध्ये मोठ्या प्रमाणात वन विभागाचे नुकसान झाले. याप्रकरणी संबंधित व्यक्तीला वन विभागाने अटक केली. त्याला वणवा लावल्याप्रकरणी पंधरा हजारांचा दंड व न्यायालय उठेपर्यंत शिक्षा ठोठावण्यात आली.
वरकुटे-मलवडी येथील भिवा जगन्नाथ खरात यांनी मंगळवार, दि. १६ रोजी उसाचे पाचट पेटवले होते. ही आग लगतच्या मालकी क्षेत्राला लागून ती वरकुटे मलवडी येथील वनक्षेत्रात पसरत गेली. या घटनेमध्ये वनक्षेत्राचे नुकसान झाले. त्यानंतर वन खात्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी भिवा खरात याला अटक करून गुरुवार, दि. १८ रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हसवड यांच्याकडे हजर केले. न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीस पंधरा हजार रुपयांचा दंड व न्यायालय उठेपर्यंत शिक्षा सुनावली. ही कार्यवाही एम. पी. मुळे वनपरिक्षेत्राधिकारी दहीवडी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल ए. डी. सावंत, वनरक्षक एच. जी. बालटे, यु. बी. ठोंबरे यांनी केली.