सातारा : माजगाव (ता. सातारा) गावच्या कमानीजवळ एका फायनान्स कर्मचाऱ्याला मारहाण करून त्याच्याकडील ५० हजारांची रोकड आणि टॅब, मोबाईल चोरून नेल्याची खळबळजनक घटना दि. १३ जुलै रोजी भरदुपारी बाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात तीन अज्ञात युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणेश वैजनाथ राख (वय २२, मूळ रा. कुपवाड, सांगली, आनंदनगर, ता. मिरज, सध्या रा. उंब्रज, ता. कऱ्हाड) हा एका फायनान्स कंपनीमध्ये पैसे वसुलीचे काम करतो. गणेश हा मंगळवार, दि. १३ रोजी दुपारी माजगाव येथून पैसे घेऊन दुचाकीवरून निघाला होता. यावेळी माजगावच्या कमानीजवळ त्याला तीन युवकांनी अडवले. त्यानंतर त्याला त्यांनी काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तो घाबरला. यावेळी त्याच्याजवळ असलेली बॅग त्यांनी हिसकावून घेतली व त्यानंतर ते तेथून पसार झाले. गणेश याच्याकडील बॅगमध्ये ५० हजारांची रोकड आणि टॅब, मोबाईल होता. या प्रकारानंतर गणेश राख याने बोरगाव पाेलीस ठाण्यात याविषयीची तक्रार दाखल केली. गणेशने सांगितलेल्या वर्णनावरून पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. आजूबाजूच्या गावातील खबऱ्यांनाही पोलिसांनी सतर्क केले आहे. लवकरच या चोरट्यांना पकडण्यात येईल, असे बोरगाव पोलिसांनी सांगितले.