सातारा : येथील सातारा पंचायत समितीमधील गणपतीसाठी लावण्यात आलेल्या डेकोरेशनला शाॅर्टसर्किटमुळे आग लागली. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.
सातारा पंचायत समितीमध्ये गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास या डेकोरेशनला अचानक आग लागली. या आगीत मंडपाच्या कापडाने पेट घेतल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी धाव घेतली. हातात झुडपे घेऊन ती नागरिकांनी आगीच्या ज्वाळांवर मारली. त्यामुळे आग आटोक्यात आली. मात्र, या आगीत डेकोरेशनचे साहित्य जळाले असून गणपतीच्या मूर्तीला या आगीची कोणतीही झळ बसली नाही.
दरम्यान, पंचायत समितीच्या निष्काळजीपणामुळे ही आग लागली असून या ठिकाणी एखाद्या कर्मचाऱ्याची नेमणूक करायला हवी होती, असे मत आग आटोक्यात आणण्यासाठी आलेल्या फारूक पटणी यांनी व्यक्त केले.
चाैकट : पंचायत समितीची यंत्रणा कुठेय?
पंचायत समितीमध्ये अग्निशामक सिलिंडर आहे की नाही, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. हा सिलिंडर असता तर नागरिकांना झाडांची झुडपे घेऊन आग आटोक्यात आणण्याची वेळ आली नसती. आता तरी या घटनेतून पंचायत समितीने बोध घ्यावा. तसेच या गणेश मंडपाशेजारी एक कर्मचारीही नेमावा.