कऱ्हाड : शहरातील बुधवार पेठेत असलेल्या भरवस्तीत बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा आवाज होऊन आगीचा भडका उडाला. या आगीत सहा ते सातजण भाजून गंभीररीत्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने बुधवार पेठेसह शहरात धावपळ उडाली असून अग्निशामक दलासह बचाव पथक तातडीने त्याठिकाणी दाखल झाले आहे. आग विझविण्यासह जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत धावपळ सुरू होती.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बुधवार पेठ येथे महात्मा ज्योतिबा फुले चौकानजीक प्रभात चित्रमंदिरासमोर वस्ती आहे. या वस्तीत दाटीवाटीने घरे असून बुधवारी रात्री अचानक या वस्तीतील एका घरात स्फोटासारखा मोठा आवाज झाला. या आवाजाबरोबरच आगीचा मोठा भडका उडाला. हा भडका एवढा भीषण होता की, दूरवरून नागरिकांच्या तो निदर्शनास आला. मोठा आवाज झाल्यामुळे नेमके काय झाले, हे नागरिकांना समजले नाही. मात्र घटना निदर्शनास येताच नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेत बचावकार्य सुरू केले. घटनास्थळावरून सहा ते सात गंभीर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलासह पोलीस अधिकारी व कर्मचारीही तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांच्याकडून आग विझवण्यासह जखमींना रुग्णालयात हलविण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. हा आगीचा भडका नेमका कशामुळे उडाला, याबाबत घटनास्थळावरून कसलीच माहिती समोर आली नाही. काही प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार आगीवेळी मोठा आवाज झाला. त्यानंतर आगीच्या ज्वाला बाहेर पडल्या. कुणाला काही समजण्यापूर्वीच ही घटना घडल्यामुळे सहा ते सातजण गंभीर जखमी झाले. तसेच वस्तीतील नागरिकांचीही भीतीमुळे धावपळ उडाली. घटनास्थळी अग्निशामक दल, रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक तसेच पोलीस दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून बचावकार्य तसेच आग विझविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
दरम्यान, शहरातील मुजावर कॉलनीत दोन महिन्यांपूर्वीच मोठ्या स्फोटाची घटना घडली होती. या स्फोटात तिघांचा बळी गेला. तर अनेक नागरिक जखमी झाले होते. अद्यापही त्यापैकी काही जणांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर आणखी एक दुर्घटना घडल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गॅस सिलेंडरच्या स्फोटाची शक्यताकऱ्हाड शहरातील बुधवार पेठेत ज्याठिकाणी आगीचा भडका उडाला त्याठिकाणच्या एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र त्याबाबतची सत्यता प्रशासनाकडून अद्याप पडताळण्यात आलेली नाही. घटनास्थळावरील बचाव कार्य आणि आग आटोक्यात आल्यानंतर स्फोट झाला का आणि झाला असेल तर तो कशाचा, हे पोलिसांकडून तपासले जाणार आहे.