वरकुटे मलवडी : वरकुटे-मलवडी (तालुका माण) येथील ढुंब्याचे शेत याठिकाणी राहणाऱ्या आबा अशोक चव्हाण यांच्या घरासमोरील शेळीच्या गोठ्यास आग लागून पाच शेळ्या व एक बोकडासह बेड, बाजरी, तांदूळ, धान्य आणि घरगुती वापरासाठीच्या कपड्यांसह संसार उपयुक्त साहित्य जळून खाक झाले आहे. तर पत्नी सनम चव्हाण यांच्यासह दीड वर्षाची अनुश्री चव्हाण या भाजून जखमी झाल्या आहेत. मात्र यामध्ये सुमारे ९० हजारांचे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वरकुटे-मलवडीपासून अडीच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ढुंब्याचे शेत या ठिकाणी आबा अशोक चव्हाण हे मजूर काम करून करणारे कुटुंब राहत होते. आबा चव्हाण हे सकाळी मजुरीकाम करण्यासाठी महाबळेश्वरवाडी या ठिकाणी गेले असता, सकाळी साडेआठच्या सुमारास शेळ्यांच्या गोठ्याच्या छपरास अचानक आग लागल्याने घरात असणाऱ्या सनम चव्हाण यांना चाहूल लागताच जीव वाचविण्यासाठी आपल्या दीड वर्षाच्या अनुश्रीला देऊन घराबाहेर पडताना भाजून जखमी झाल्या आहेत. यावेळी आजूबाजूला मदतीसाठी कोणीही नसल्याने सनम चव्हाण यांच्या नजरेसमोर शेळ्यांचा गोठा पूर्ण जळून खाक झाला. यामध्ये एक पोती बाजरी, २० किलो तांदूळ वैरण घरगुती वापरासाठीचे कपडे यासह सुमारे ९० हजारांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच तलाठी गणेश म्हेत्रे यासह पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रणजित भांगे यांनी पंचनामा केला.
यावेळी सरपंच बाळकृष्ण जगताप पोलीसपाटील धनंजय सोनावणे उपस्थित होतेे. महाबळेश्वरवाडीचे माजी सरपंच विजयकुमार जगताप व सामाजिक कार्यकर्ते धीरज जगताप यांनी या घटनेची पाहणी करून, मजुरी काम करणाऱ्या कुटुंबाला सावरण्यासाठी नागरिकांना वैयक्तिक पातळीवर मदत करण्याचे आवाहन केले आहे, तर या घटनेची माहिती वरकुटे-मलवडी पंचक्रोशीत पसरल्याने नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहेे.