मल्हारपेठ : मल्हारपेठ येथील जुन्या असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लाकडी इमारतीस रविवारी अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाली. या आगीत जुने कागद, रद्दी, साहित्य जळून खाक झाले. स्थानिक नागरिकांनी मदत करत आग आटोक्यात आणली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, जुनी संपूर्ण इमारत यावेळी पाडण्यात आली.मल्हारपेठ, ता. पाटण येथे रविवारी दुपारी दोनच्या सुमारास जुन्या असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीस अचानक आग लागल्याने नागरिकांची धावपळ उडाली. या जुन्या असणाऱ्या इमारतीत आरोग्य केंद्राची खूप वर्षांपासून पडून असलेले कागदपत्रे, साहित्य तसेच इतर लोखंडी साहित्य पडले होते. गेली ३० ते ४० वर्षांपासून ही इमारत बंद अवस्थेत होती. ही इमारत पाडण्यात यावी, यासाठी आरोग्य केंद्राकडून ही मागणी करण्यात आली होती. लाकडी इमारत पाडण्यात यावी, यासाठी जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने गेल्या सात-आठ वर्षांत कोणतीही कारवाई झाली नाही.मात्र, रविवारी दुपारच्या सुमारास अचानक या इमारतीला आग लागल्याने स्थानिक नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. यामध्ये आग विझविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केले. जुन्या असणाऱ्या इमारतीत आरोग्य विभागाचे आपले वेस्टेज साहित्य ठेवले होते. यात कागद तसेच लोखंडी पाइप्स, लाकडे यांनी मोठ्या प्रमाणावर पेठ घेतलेले आग आटोक्यात येत नव्हती. त्यावेळेस स्थानिक ग्रामस्थांनी आणि युवकांनी पाण्याची व्यवस्था करून आग आटोक्यात आणली. त्यानंतर अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी राहिलेली आग विझविण्यात आली. त्यानंतर कमकुवत झालेली इमारत पाडण्यात यावे, अशी मागणी होत होती. मात्र, रविवारी लागलेल्या आगीनंतर स्थानिकांनी ही इमारत धोकादायक असल्याने जीर्ण झालेल्या या इमारतीवर लगेच पावले उचलून प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीने ही इमारत जेसीबीद्वारे उद्ध्वस्त केली.यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य विजय पवार, पंचायत समिती माजी सदस्य सुरेश पानस्कर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष शंकर शेडगे, माजी उपसरपंच नीलेश चव्हाण, वैद्यकीय अधिकारी सोहेल शिकलगार, ग्रामसेवक प्रमोद ठोके, ग्रामस्थ उपस्थित होते.
सातारा: मल्हारपेठेतील आरोग्य केंद्राच्या जुन्या इमारतीस आग; कागदपत्रे जुळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 12:10 PM