लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : दरे तर्फ परळी येथील महादेव गोविंद तुपे यांच्या जनावरांचा गोठा डोंगराला लागलेल्या वणव्याच्या भक्षस्थानी आल्याने संपूर्ण गोठा जळून खाक झाला. यामध्ये दोन कडब्याच्या गंज्या तसेच तीन गायी भाजून जखमी झाल्या होत्या. त्यातील दोन गायींचा मृत्यू झाला.
दरे तर्फ परळी येथील महादेव गोविंद तुपे यांच्या गोठ्याशेजारी असणाऱ्या डोंगराला वणवा लागला होता. त्याच वणव्याची आग जनावरांच्या गोठ्याला लागल्याने आर्थिक नुकसान झाले. गोठ्याशेजारी लावलेल्या दोन गवताच्या गंज्या तसेच तीन गायी आगीत होरपळलेल्या होत्या. यानंतर सोनवडी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली या गायींवर औषधोपचार सुरू होते. मात्र, त्यातील दोन गायींची झुंज अपयशी ठरली. घराला लागलेल्या आगीमध्ये तुपे यांनी आपली जनावरे वाचवण्यासाठी धडपड केली. मात्र यामध्ये ते देखील जखमी झाले. या घटनेचा पंचनामा तलाठी, सर्कल, सरपंच तसेच सदस्यांनी केला.