पुसेगाव :
सातारा - पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला शिंदेवाडी (कटगुण, ता. खटाव) येथील माळरानावर असलेल्या डुरीयम डोअर्स इंडस्ट्रीज कंपनीला रविवारी सकाळी सात वाजता आग लागली. लॅमिनेटेड दरवाजे उत्पादित करणारी ही कंपनी असून, या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
शिंदेवाडी आणि निढळ या दोन्ही गावांच्या मधोमध ही दरवाजे बनविणारी कंपनी आहे. दरम्यान, आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी कंपनीकडे धाव घेतली. तसेच कंपनीचे मालक वसंत पटेल (रा. पुसेगाव) यांना कंपनीमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच त्यांनी अग्निशमन दलाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अग्निशमन दलाशी वेळेत संपर्क न झाल्यामुळे बंब घटनास्थळी पोहोचण्यासाठी उशीर झाला. सुरुवातीला उपाययोजना म्हणून पटेल यांनी स्थानिक पाण्याच्या टँकरच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी, मोठ्या प्रमाणावर लाकूड तसेच प्लास्टिक जळत असल्यामुळे कंपनीतून आगीचे डोंब निघत होते. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. दोन बंबांनी आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, प्लायवूड दरवाजे, लाकडी साहित्य, मशिनरी जळून खाक झाली आहे. तसेच ही आग नेमकी लागली कशामुळे, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, घटनास्थळी पुसेगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते.
फोटो : २९पुसेगा
शिंदेवाडी फॅक्टरीला भीषण आग लागल्यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. (छाया : केशव जाधव)