मायणी : येथील पक्षी आश्रयस्थानातील वन उद्यानामध्ये गुरुवारी सकाळी अकरा वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली. वनकर्मचारी व गावातील युवकांनी प्रसंगावधान दाखवून वनक्षेत्रात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र वर्षानुवर्षे मायणी पक्षी आश्रयस्थानात विविध कारणांमुळेे वणवा लागत असल्याने यावर ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे.
मायणी ब्रिटिशकालीन तलावाजवळ सुमारे ६५ हेक्टर क्षेत्रावर मायणी वनउद्यान आहे. या वन उद्यानामध्ये विविध जातींचे हजारो वृक्ष आहेत. या वन उद्यानामध्ये गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्यासुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. मायणी पक्षी आश्रयस्थानात
वनरक्षक असलेल्या संजीवनी खाडे यांनी लागलेल्या आगीबद्दल मायणी येथील सामाजिक कार्यकर्ते महेश जाधव यांना फोनवरून माहिती दिली.
या आगीबाबत महेश जाधव, स्वप्नील घाडगे सोशल मीडियावर पोस्ट फिरताच गावातील सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रात कार्यरत असलेले मायणी गावचे पोलीसपाटील प्रशांत कोळी, श्रीकांत सुरमुख, सुशांत कोळी, सूरज खांडेकर, धनंजय लिपारे, संदीप लुकडे, वामन जाधव, संजय कणसे, अनिल कचरे, ग्रामपंचायत कर्मचारी भिसे, राजपथ डेव्हलपमेंटचे कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन वन कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. तरीही सुमारे दोन एकर क्षेत्रातील शेकडो लहान-मोठी झाडे या आगीत भस्मसात झाली.
येथील पक्षी आश्रयस्थान व परिसरामध्ये विविध जातींचे पक्षी बाराही महिने वास्तव्यास असतात. त्यामुळे नुकताच शासनाकडून या भागाला राखीव पक्षी संवर्धनाचा दर्जा दिलेला आहे. मात्र, वर्षानुवर्षे या परिसरात विविध कारणांमुळे वणवा लागत असतो व यामध्ये शेकडो वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असतात. त्यामुळे याठिकाणी वणवे आटाेक्यात आणण्यासाठी ठोस व कायमस्वरुपी उपाययोजना होणे गरजेचे आहे.
(कोट..)
अनिल कचरे यांचा माती टाकण्यासाठी जेसीबी व रस्ता ठेकेदारांनी पाण्याचा टँकर आग आटोक्यात आणण्यासाठी देण्याची विनंती केली. घटनेचे गांभीर्य पाहून दोघांनीही केलेल्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे ही आग लवकर आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली.
-
प्रशांत कोळी, पोलीस पाटील मायणी
(कोट..)
गुरुवारी सकाळी अकरा वाजता शॉर्टसर्किटने वन उद्यानाच्या पूर्व बाजूस मायणी म्हसवड मार्गालगत लागलेली आग वनकर्मचारी व युवकांनी वेळीच प्रसंगावधान दाखवून सहकार्य केल्यामुळे आटोक्यात आली व मोठा अनर्थ टळला.
- संजीवनी खाडे, वनरक्षक वनमंडल, मायणी
मायणी वन उद्यानामध्ये लागलेली आग आटोक्यात आणताना वन कर्मचारी, ग्रामस्थ व युवक. (छाया : संदीप कुंभार)