शेंद्रे : सोनगाव डेपोतील कचऱ्याला शुक्रवारी रात्री लागलेली आग आटोक्यात न आल्याने सोनगाव, जकातवाडी परिसरात धुराचे लोट पसरले होते. पालिकेकडून याबाबत कोणतीच उपाययोजना न केल्याने संतप्त ग्रामस्थांनी रविवारी सकाळी कचरा डेपोबाहेर घंटागाड्या अडवून ठेवल्या. जोपर्यंत आग विझविली जात नाही व धूर बंद होत नाही, तोपर्यंत डेपोत कचरा टाकू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता.गेल्या अनेक वर्षांपासून धुमसत असलेल्या सोनगाव कचरा डेपोतील धुराचा प्रश्न अद्यापही जैसे थे आहे. कचºयाला आग लागली की पालिकेच्या वतीने आगीवर तात्पुरते नियंत्रण आणले जाते; परंतु कालांतराने पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवते. शुक्रवारी सायंकाळी डेपोतील कचºयाने अचानक पेट घेतल्याने सर्वत्र धुराचे लोट परसले होते. शनिवारी दिवसभर व रविवारी सकाळी सोनगाव, जकातवाडी, डबेवाडी या गावांसह सुमारे सात ते आठ किलोमीटर क्षेत्रात धुराचे लोट पसरले होते.