उंब्रज : पाटण तालुक्यातील कडवे बुद्रुक येथील हिंदुराव पन्हाळे यांच्या गुरांच्या गोठ्याला शनिवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत दोन बैल आणि चार म्हशी मृत्युमुखी पडल्या, तर एक म्हैस भाजून गंभीर जखमी झाली. यामध्ये पन्हाळे यांचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाले.हिंदुराव पन्हाळे यांचा कडवे बुद्रुक येथील गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर गुरांचा गोठा आहे. या गोठ्यामध्ये दोन बैल आणि चार-पाच म्हशी होत्या. तसेच गुरांचा चाराही मोठ्या प्रमाणात साठविण्यात आला होता. दरम्यान, शनिवारी रात्री अकराच्या सुमारास अचानक गुरांच्या गोठ्याला आग लागली. पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. संपूर्ण गुरांचा गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. दोन बैल आणि चार म्हशी या आगीत जळून खाक झाले, तर एक म्हैस भाजून गंभीर जखमी झाली. आग लागल्याचे समजल्यानंतर काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सर्वकाही होत्याचं नव्हतं झालं होतं. जनावरांचा चाराही आगीत जळून खाक झाला.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तारळे दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी आणि तलाठ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. तलाठ्यांनी पंचनामा केला. हिंदुराव पन्हाळे यांची उपजीविका जनावरे आणि शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे शासनाने त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
पाटण तालुक्यातील कडवे बुद्रुकमध्ये आग; सहा जनावरांचा होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 10:55 PM