पेट्री : कास मार्गावर गणेशखिंड परिसरात अज्ञातांकडून शनिवारी रात्री वणवा लागला. यामुळे गणेशखिंड परिसर पुन्हा वणव्यात होरपळूण निघाला होता. लागलेला वणवा विझविण्यासाठी कास पठार समितीच्या कर्मचाऱ्यांनी झाडाच्या डहाळ्यांच्या साहाय्याने रात्री आठ ते पावणेअकरा अशी तब्बल तीन तास आग आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. अखेर त्यांना वणवा पूर्णपणे विझविण्यात यश आले. वनसंपदेचे, प्राणीसंपदेचे मोठ्या स्वरूपात होणारे संभाव्य नुकसान टळले.गणेशखिंड परिसरात शनिवारी रात्री वणवा लागून मोठ्या प्रमाणावर वनसंपदा नष्ट झाली होती. प्राणी संपदेलाही या वणव्यामुळे मोठ्या प्रमाणावर धोका पोहोचत आहे. कित्येक पशूपक्ष्यांचे निवारे नष्ट होऊन शेकडो टन चारा आगीत खाक होत आहे. बहरण्यापूर्वीच कित्येक वृक्ष वणव्यात होरपळले जात आहेत. परिसरात विदारक असे भकास चित्र पाहावयास मिळत आहे. हिरव्यागार वनराईने नटलेल्या परिसरात वारंवार वणव्यांच्या घटनेने निसर्गाचे सौंदर्य लोप पावत चालले आहे. पर्यावरणाला धोका पोहोचलेला असताना अद्यापही अज्ञातांकडून वणवा लावण्याचे सर्रास प्रकार घडत आहेत.कास पठार समितीच्या कर्मचाऱ्यांकडून अज्ञातांकडून लागलेल्या वणव्याची आग आटोक्यात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. वणवा विझविण्यासाठी अभिषेक शेलार, विठ्ठल कदम, सीताराम बादापुरे, विजय बादापुरे, चंदर कदम आदी कर्मचारी होते. पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून झाडाच्या डहाळ्यांद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन केले आहे. जीव मुठीत धरून वनसमितीचे कर्मचारी वणवा विझवितात. दरम्यान, सर्पदंश अथवा एखाद्या अपघातासंदर्भात विमा संरक्षण महत्त्वाचे असल्याची माहिती समितीच्या कर्मचाऱ्याने व्यक्त केली.
..तर विकासापासून कोसो दूर जाऊगणेशखिंड परिसरात शनिवारी विघ्नसंतुष्टांकडून लावण्यात आलेल्या वणव्याने रौद्ररूप धारण केले. हळूहळू संपूर्ण डोंगर परिसरात आग पसरली. धुराचे लोट वाहत होते. कित्येक झाडेदेखील होरपळली. अशा विदारक घटनांमुळे आम्हाला जगू देताय की नाही?, असे मनोगत व्यक्त करणाऱ्या झाडांच्या भावना ओळखून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी आपण सर्वांनीच घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा पर्यावरणाच्या विकासाबाबत आपण कोसो दूर जाऊ, अशी शक्यता पर्यावरणप्रेमींतून व्यक्त होत आहे.
वणव्यांमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. कित्येक झाडे आगीत नष्ट होऊन वातावरणात तापमानाचे प्रमाण वाढत आहे. भूजल पातळीही अत्यल्प होत चालली आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर रानमेवा उपलब्ध होत आहे. कित्येकजण रानमेवा विकून उदरनिर्वाहासाठी अर्थार्जन करतात. वणवे लागत असल्याने रानमेवा अडचणीत येण्याची शक्यता आहे. वणवा लागणार नाही याची काळजी सर्वांनी घेऊन पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन करावे हे आपले कर्तव्य आहे. - अभिषेक शेलार, कर्मचारी, कास पठार कार्यकारी समिती