फलटण : फलटण पालिका आवारातील गोदामाला बुधवारी रात्री अकराच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये महत्त्वाची कागदपत्रे व इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झाले. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले. ही आग लागली की लावली, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. याबाबत माहिती अशी की, फलटण नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाशेजारी जुन्या शांती चित्रमंदिरच्या जागेत पालिकेचे गोदाम आहे. यामध्ये महत्त्वाची कागदपत्रे, स्टेशनरी व इलेक्ट्रिक साहित्य ठेवलेले असते. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास गोदामाच्या मधल्या भागात अचानक आग लागली. पालिकेच्या आवारातच पेव्हिंग ब्लॉकचे काम करीत असलेल्या ठेकेदाराला आग लागल्याचे निदर्शनास आले. त्याने तातडीने पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोबाईलवरून याची माहिती दिली. तसेच अग्निशमन बंबही बोलाविला. आगीची माहिती समजताच मोठा जमाव जमा झाला होता. काहींनी गोदामाचे दार तोडून आत प्रवेश करीत आग विझविण्याचा प्रयत्न केला. सुमारे तीन तासांनी आग विझविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत महत्त्वाची कागदपत्रे, स्टेशनरी, इलेक्ट्रिकचे साहित्य जळून खाक झाले. आग लागली तेथून गोदामाचे वायरिंग लांब असल्याने शॉर्टसर्किटने आग न लागल्याचा अंदाज बांधला जात आहे. या घटनेची चौकशी करण्याची मागणी होत आहे. डिझेलची टाकी सुरक्षित आग लागलेल्या गोदामामध्येच डिझेलची टाकी ठेवलेली होती. मात्र, सुदैवाने आग या टाकीपर्यंत पोहोचली नाही, अन्यथा मोठी हानी झाली असती. गोदामामधील धूर व आगीच्या ज्वाळा बाहेर जाण्यासाठी गोदामाचा पत्रा काहीजणांनी जीव धोक्यात घालून उचकटला. त्यामुळे आगीची तीव्रता कमी झाली.(प्रतिनिधी)
फलटण पालिकेच्या गोदामाला आग
By admin | Published: March 06, 2015 12:29 AM