मायणी : विखळे येथील वीजवितरण कंपनीच्या उपकेंद्रामधील ट्रान्सफार्मरमध्ये शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास अचानक आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाची गाडी बोलाविण्यात आली होती. या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, विखळे येथे वीजवितरण कंपनीचे उपकेंद्र आहे. ३३ केव्हीचे दोन स्वतंत्र ट्रान्सफार्मर आहेत. यातील एका ट्रान्सफार्मरमध्ये शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास अचानक आग लागली. हळू-हळू आगीने रौद्ररूप धारण केले. परिसरामध्ये काही क्षणांतच परिसरात काळा धूर पसरू लागला.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व मोठा अनर्थ घडू नये म्हणून संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी विटा नगरपरिषदची अग्निशामक गाडी बोलावली. त्यानंतर आग आटोक्यात आली. या केंद्रातून परिसरातील विखळे, कलेढोण, पाचवड, मुळकवाडी, तरसवाडी, ढोकळवाडी, गारूडी, गारळेवाडी आदी गाव व परिसरामध्ये वीजपुरवठा केला जातो. उपकेंद्रातील हा ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे या गावांच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
चौकट -
ट्रान्सफॉर्मरमधील हा बिघाड किंवा ओव्हर हिटमुळे ही आग लागली असावी अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
फोटो संदीप कुंभार यांनी मेल केला आहे.
विखळे येथील विद्युत उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर शुक्रवारी जळाल्यामुळे आगीचे लोट पसरले होते (छाया : संदीप कुंभार)