कोपर्डे हवेली (जि. सातारा) : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. पारंपारिक पध्दतीने शेती करण्याचे दिवस संपले असून शेतकरी आधुनिक पध्दतीने शेती करत आहेत. त्यातच काही भागात वन्यप्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी शेतकरी विविध क्लुप्त्या लढवत असतानाच उत्तर कोपर्डे, ता. कºहाड येथील शालेय विद्यार्थी जिवन पवार याने वन्य प्राण्यापासुन, पक्षापासुन पिकांचे संरक्षण करण्यासाठी एका विशिष्ट बंदुकीची निर्मिती केली आहे. जिवनची ही बंदुक परीसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.
उत्तर कोपर्डे येथील जिवन तानाजी पवार याने पिकांचे संरक्षण व्हावे व जिवितहानी होऊ नये, अशी बंदुक तयार करण्याचा निर्णय घेतला. बंदुक तयार करण्यासाठी त्याने दोन फुट लांबीची व दीड इंच व्यास असलेली गोलाकार पीव्हीसी पाईप घेतली. त्याला इंग्रजीतील ‘वाय’ आकाराचा ‘एल्बो’ व दुसरा सरळ ‘एल्बो’ वापरला.
पाईपच्या वरील बाजुस फायबरचे एक झाकण तयार केले. त्याच्या खाली पाईपमध्ये लायटर बसवला. लायटरचे बटन खालील बाजुस तयार केले. त्या बटनचा चाप म्हणुन वापर केला. फायबरच्या झाकणातुन अत्तरचा स्प्रे मारावा लागतो. तो स्प्रे लाईटरलर पडला आणि लायटरचा खटका ओढल्यानंतर स्प्रे पेट घेवुन आवाज देतो.
या आवाजाला पशुपक्षी घाबरतात. त्यामुळे त्याचा वापर पिकाच्या संरक्षणासाठी करता येऊ शकतो. हे करत असताना गोळी म्हणुन त्या आकाराचे कांदे, बटाटे, टोमॅटो याचा वापर करावा लागतो. सुमारे सहाशे ते साडेसहाशे फुट लांबपर्यंत ही फळे जातात. या फळांमुळे पशु, पक्षाना ईजा होत नाही. मात्र, आवाजाने शेतातील वन्यजीव पळुन जातात.
अत्तराच्या अडीचशे मिलीच्या बाटलीमध्ये सातशे ते आठशे स्प्रे होतात. तेवढ्यावेळा आवाज होतो. या बंदुकीला वेगवेगळे रंग देण्यात आले आहेत. त्यामुळे बंदुक दिसायला सुंदर दिसते. मात्र, वजनाने हलकी आहे.
याशिवाय या बंदुकीने झाडावरील नारळ पाडता येतात. मात्र, त्यासाठी गोळी म्हणून बटाट्यांचा वावर करावा लागतो. एखाद्या कार्यक्रमात फुलांची उधळण करण्यासाठीही ही बंदुक वापरता येऊ शकते. त्यासाठी बंदुकीच्या नळीत फुले भरून चाप ओढल्यास फुले उंचीवर जावुन खाली पडतात.
विवाह सभारंभावेळी फटाक्यांऐवजी आवाज काढण्यासाठीही या बंदुकीचा वापर होऊ शकतो. ही बंदुक तयार करण्यासाठी जिवनला साडेचारशे रूपये खर्च येतो. गोफण, बुजगावणे होणार कालबाह्य
पिकातुन पक्षाना हुसकावुन लावण्यासाठी यापुर्वी गौफण, लगोरी, फटाके, बुजगावणे याचा वापर शेतकºयांकडून केला जात होता. मात्र, या पारंपारीक साधनांचा सध्या म्हणावा तेवढा उपयोग होत नाही. पक्षांनाही याची सवय झाली आहे. त्यामुळे जिवनने तयार केलेली बंदुक शेतकºयांसाठी निश्चितच फायदेशिर ठरणार असल्याची चिन्हे आहेत.