रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्यास मनाई आहे. मात्र, तरीही वाढदिवसाच्या निमित्ताने व विविध कार्यक्रमाच्या अनुषंगाने गर्दी केली जात आहे. त्यातच अलीकडे युवकांमध्ये वाढदिवसाची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे, वाहनांच्या बॉनेटवर किंवा दुचाकीवर केक ठेवून कापणे, अनेकवेळा युवकांच्या गराड्यामध्ये वाहनावरती केक ठेवून तो तलवारीने कापणे, केक कापल्यानंतर मोठमोठ्या आवाजात ओरडणे, फटाके फोडणे अशा प्रकारे वाढदिवस साजरा करण्याचे फॅड युवकांमध्ये निर्माण झाले आहे. यातूनच सामाजिक शांतता भंग होत असून, गुंडगिरीला प्रोत्साहन मिळते. त्यामुळे रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. मात्र, तरीही काहीजण पोलिसांचे आदेश धुडकावून रस्त्यावर वाढदिवस साजरा करतात.
कऱ्हाडातील मध्यवस्तीतही असाच प्रकार घडला. मध्यरात्री धुमधडाक्यात युवकाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त दहा ते पंधरा मित्र रात्री बारा वाजण्याच्या सुमारास एकत्र जमले होते. वाढदिवस साजरा करून त्यांनी फटाके फोडले. या फटाक्यांचा आवाज शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह रात्रगस्त घालत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक भैरव कांबळे यांनी ऐकला. वायरलेसद्वारे मेसेज देऊन अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांना पाहताच बर्थडे बॉयने पलायन केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी बर्थडे बॉयसह वाढदिवसामध्ये सहभागी झालेल्या सर्व युवकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना समज दिली.