सातारा : दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोमवारी सगळीकडे फटाक्याची जोरदार आतषबाजी झाली. फाटाके फोडण्याचा आनंद लुटत असतानाच यामध्ये तीन अल्पवयीन मुले तर एक व्यक्ती भाजून जखमी झाली. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात सोमवारी धुमधडाक्यात दिवाळीला प्रारंभ झाला. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे दिवाळी साजरी करता आली नाही. यंदा मात्र, कोणतेही निर्बंध नसल्याने मुलांनी पहिल्या दिवसांपासूनच फटाके फोडण्याचा आनंद लुटण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी सोमवारी तीन अल्पवयीन मुले आणि एक व्यक्ती भाजून जखमी झाली. या चाैघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोणाचा हात तर कोणाचा चेहरा फटाक्यामुळे भाजला आहे.
तिन्ही अल्पवयीन मुलांवर प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. परंतु एक व्यक्ती फटाक्यामुळे भाजून गंभीर जखमी झाल्यामुळे त्या व्यक्तीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात अद्यापही उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
पालकांनी लहान मुलांच्या हातात फटाके देताना काळजी घेतली पाहिजे. फटाके कसे फोडावेत, याची माहिती मुलांना नसल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.