सातारा : फटाक्यांमुळे वायू प्रदूषण होते. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. यासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत फटाकेमुक्त ग्रामपंचायत उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी ग्रामपंचायतींना गुणही देण्यात येणार आहेत.दिवाळीचा सण आनंदाचा असतो. यामुळे या सणाला फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. कोट्यवधी रुपयांचे फटाके फुटतात; पण या फटाक्यांमुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. तसेच फटाक्याच्या धुरामुळे श्वास घेताना त्रास होतो. हे प्रदूषण टाळण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. यासाठी ‘फटाकेमुक्त ग्रामपंचायत’ हा उपक्रम राबविला जात आहे.महाराष्ट्र शासनाकडून माझी वसुंधरा अभियान ४.० राबविण्यात येत आहे. हे अभियान भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांवर आधारित आहे. या अभियानाच्या माध्यमातून निसर्गाशी संबंधित वरील पंचतत्त्वावर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी राबविण्यात येत आहे. वायू तत्त्वाचे संरक्षण करता यावे म्हणून हवेच्या गुणवत्तेसाठी वायू प्रदूषण कमी करून हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, हा निकष या अभियानात आहे. यामुळे फटाके मुक्त दिवाळीसाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतल्यास त्यांना या उपक्रमासाठी १५० गुण देय राहणार आहेत.सातारा जिल्हा परिषदेनेही गटविकास अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून याबाबत सूचना केली आहे. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहनही केले आहे.
फटाक्यांमुळे विषारी वायू वातावरणात पसरतो. त्यामुळे आरोग्यास हानी पोहोचू शकते. माझी वसुंधरा अभियान ४.० च्या अंमलबजावणीच्या निमित्ताने दिवाळी सणात ग्रामपंचायतींनी फटाकेमुक्त सण साजरा करण्याचा निर्णय स्वेच्छेने घेतल्यास प्रदूषणाची पातळी कमीत कमी राहील. तसेच अभियानाच्या मूल्यमापनात ग्रामपंचायतीला १५० गुण मिळतील. - ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी