ऑनलाइन लोकमत सातारा, दि. 15 - येथील राजपथावरील मुथा आर्केड इमारतीमधील कापड दुकानाला शॉर्टसर्किटमुळे रविवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. सुमारे साडेतीन तासांनंतर आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमक दलाला यश आले.मोती चौकापासून जवळच असलेल्या मुथा आर्केड या इमारतीच्या बेसमेंटला १३ दुकान गाळे आहेत. यामध्ये एक कापड दुकान आहे. या दुकानाला रविवारी सकाळी सात वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली. रस्त्यावर धूर आल्यानंतर ही आगीची घटना लोकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर अग्निशमक दलाला याची माहिती देण्यात आली. अजिंक्यतारा कारखान्यावरील दोन आणि सातारा पालिकेचे दोन असे चार अग्निशमक बंब घटनास्थळी पंधरा मिनिटांतच पोहोचले. कापड दुकान बेसमेंटला असल्यामुळे धूर मोठ्या प्रमाणात बाहेर येत होता. त्यामुळे आग विझविण्यात अडचणी येत होत्या. मात्र, तरीही अग्निशमक दलाचे जवान पाण्याचे फवारे मारून आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. पाण्याचे फवारे मारल्यामुळे बेसमेंटचा व्हरांडा पाण्याने भरला. भर मोती चौकात आग लागल्याचे समजताच सकाळी-सकाळी ही आग पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे पोलिसांनी मोती चौकातील वाहतूक बंद केली होती. अग्निशमक दलाने सतत पाण्याचे फवारे मारल्याने सुमारे साडेतीन तासांनंतर आग आटोक्यात आली. दुकानातील सर्व फर्निचर, विविध प्रकारचे कपडे असा सुमारे पाच लाखांचा ऐवज या आगीीत जळून खाक झाला. या दुकानाच्या शेजारी असलेल्या चार दुकान गाळ्यांनाही आगीची झळ बसली. मात्र, यामध्ये त्यांचे फारसे नुकसान झाले नाही. नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले, नगरसेवक धनंजय जांभळे, कल्याण राक्षे यांनी घटनास्थळी भेट देऊन आग विझविण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. (प्रतिनिधी)पोलिसांची धडपड !आग लागल्याचे समजताच बहुजन क्रांती मोर्चाच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी सुरुवातीला शेजारील दुकानातून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे त्यांना काहीच करता आले नाही. अग्निशमक दल येईपर्यंत पोलिसांचे प्रयत्न सुरूच होते.
साताऱ्यात कापड दुकानाला आग
By admin | Published: January 15, 2017 6:35 PM