पाचवड : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर सोमवारी पहाटे रोहिदास ऊर्फ बापू चोरगे (रा. पुणे) व त्याच्या अन्य साथीदारांनी टोलच्या पैशावरून वादावादी करून त्यांच्या जवळील पिस्तुलने गोळीबार करून पोबारा केला होता. या गोळीबारातील गुंड अक्षय जालिंदर हरगुडे (वय २४, रा. केनंद, ता. हवेली, जि. पुणे), वैभव संजय साबळे (रा. साबळेवाडी, ता. खेड, जि. पुणे), विठ्ठल नामदेव वालगुडे (३०, रा. मार्गासनी, ता. वेल्हा, जि. पुणे), युवराज ज्ञानेश्वर वाबळे (२३, रा. केसनंद, ता. हवेली, जि. पुणे) या सर्वांना पुणे येथून ताब्यात घेतले.याबाबत माहिती अशी की, आनेवाडी टोलनाक्यावर सोमवारी पहाटे एकच्या सुमारास या गुंडांकडून गोळीबार करण्यात आला होता. तसेच एका टोल कर्मचाऱ्यास दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर या सर्व गुंडांनी तेथून पुण्याच्या दिशेने पलायन केले. या घटनेची तातडीने दखल घेत सर्व आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके पुण्याकडे रवाना झाली होती.
पुणे व इतर आसपासच्या भागामध्ये तीन दिवसांपासून या गुंडांचा पोलिसांकडून शोध सुरूच होता. शनिवार दि. ३० रोजी पहाटे दोनच्या सुमारास या गुंडांना पोलिसांकडून मोठ्या शिताफीने पकडण्यात आले. या सर्व गुंडांवर भुर्इंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.