कोरेगाव / सातारारोड : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून महिन्याभरापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून कोरेगाव तालुक्यातील सातारारोड येथे रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास माजी उपसरपंच व त्याच्या साथीदारांनी एकावर गोळीबार व तलवार हल्ला केला. दरम्यान, माजी उपसरपंचाच्या वडिलांवरही तलवार हल्ला झाल्याची फिर्याद दाखल झाली आहे. अशोक शिवराम फाळके (वय ५३, रा. सातारारोड-पाडळी) असे गोळीबार व तलवार हल्ल्यात जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. माजी उपसरपंच किशोर फाळके व इतरांनी त्यांच्यावर तलवारीने वार करून डबल बॅरलच्या बंदुकीने दोन गोळ्या झाडल्या. दरम्यान, किशोर फाळके याचे वडील संपत फाळके यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरूआहेत. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. संशयित किशोर फाळके याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, बंदूक आणि तलवारी जप्त केल्या आहेत. घटनास्थळावरून आणि पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सातारारोड-पाडळी स्टेशन ग्रामपंचायतीची निवडणूक दोन महिन्यांपूर्वी झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत दोन पॅनेलमध्ये लढत झाली. त्यात माजी उपसरपंच किशोर फाळके याच्या पॅनेलचा पाडाव झाला; मात्र तो स्वत: निवडून आला होता. किशोर फाळके व अशोक फाळके यांच्यामध्ये घरगुती कारणाबरोबरच निवडणुकीवरूनही वाद होता. अशोक फाळके यांनी विरोधी पॅनेलचे काम केल्याने किशोर फाळके त्याच्यावर चिडून होता. महिन्यापूर्वी बसस्थानक चौकात दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. रविवारी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास अशोक फाळके हे दुचाकीवरून सातारारोड बाजारपेठेत आले होते. आपल्या आईची औषधे नेण्यासाठी डॉक्टरांची फाईल त्यांनी बरोबर आणली होती. नेहमीप्रमाणे संतोष पवार यांच्या भांडी दुकानाबाहेर खुर्चीवर बसून वृत्तपत्र वाचत होते. त्यावेळी किशोर संपत फाळके, संपत व्यंकट फाळके, सूरज डिसले आणि अन्य एक असे चौघे तेथे गेले. किशोर फाळके याने बंदुकीतून दोन गोळ्या अशोक फाळके यांच्या दिशेने झाडल्या. त्यापैकी एक गोळी पायात घुसली, तर दुसरी खुर्चीतून आरपार गेली. त्यानंतर अन्य तिघांनी अशोक फाळके यांच्यावर तलवारीने वार केले आणि निघून गेले. अशोक फाळके रक्ताच्या थारोळ्यात तेथेच पडून होते. अशोक फाळके यांचे बंधू भरत, मुलगा अमोल तसेच कपिल फाळके, प्रताप फाळके यांनी तत्काळ धाव घेऊन जीपमधून त्यांना सातारच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र प्रकृती चिंंताजनक असल्याने आधी सातारच्या खासगी रुग्णालयात आणि नंतर पुणे येथे नेण्यात आले. दरम्यान, किशोर फाळके यांचे वडील संपत फाळके यांच्या डोक्यावर अशोक फाळके यांनी तलवारीने वार केल्याने ते जखमी झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. त्यांना प्रथम कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयात व नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी फौजफाट्यासह धाव घेतली. त्यांनी किशोर फाळके याला घरातून ताब्यात घेतले आणि बंदूक, तलवार जप्त केली. घटनेनंतर सातारारोड बाजारपेठ बंद झाली. गावात तणावपूर्ण वातावरण होते. सातारारोडसह पाडळी गावात सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. (प्रतिनिधी)परस्परविरोधी फिर्यादी दाखल
राजकीय वादातून गोळीबार
By admin | Published: June 28, 2015 11:03 PM