सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गडकोटांच्या तटबंदीसह गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन, वृक्ष लागवड करताना घ्यावयाची काळजी अन् दुर्ग संस्थांना नोंदणीसह निधी संकलन करताना येणाऱ्या अडचणी यासह विविध विषयांवर राजधानी सातारा येथे झालेल्या पहिल्या दुर्ग परिषदेत व्यापक विचारमंथन झाले.त्याचबरोबर गडकोट संवर्धनासाठी एकमेकांच्या हातात हात घालून जिल्ह्यातील गडकोटांची शोभा वाढवण्याचा निर्धार करत संवर्धनासाठी झटणाऱ्या संस्थांची एक समितीही स्थापन करण्यात आली.सातारा जिल्ह्यातील २२ विविध दुर्ग संस्थांनी एकत्रित येत किल्ले अजिंक्यतारा येथे बुधवारी पहिली दुर्ग परिषद आयोजित केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून या परिषदेस प्रारंभ झाल्यानंतर सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या संस्थेच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर गडकोटांवरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करताना घ्यावयाची काळजी, गडावर तसेच तटबंदी परिसरात वृक्ष लागवड आणि संगोपन करताना घ्यावयाची काळजी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सोशल मीडियासह विविध समाज माध्यमांचा वापर करून गडकोट संवर्धनासाठी व्यापक प्रमाणावर महाविद्यालयीन युवक - युवती यांच्यामध्ये जनजागृती करणे, गडसंवर्धन चळवळ शाळा, महाविद्यालयापर्यंत नेण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याबाबतही पाठपुरावा करण्याचे निश्चित करण्यात आले. ऐतिहासिक वास्तूंना वृक्षामुळे धोका निर्माण झाल्यास कोणती उपाययोजना करावी, याबाबत दुर्ग संस्थांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले.किल्ले सुभानमंगल, चंदनवंदन, कमळगड, पांडवगड यासह काही किल्ल्याकडे राज्य शासनासह केंद्र सरकारचे झालेले दुर्लक्ष आणि यामुळे किल्ल्याच्या अस्तित्वाला निर्माण झालेल्या धोक्यावर चर्चा करण्यात आली. तसेच याप्रश्नी जिल्हाधिकारी तसेच शासनाकडे दाद मागण्यासह प्रसंगी लोकशाही मार्गाने लढा उभारण्याचा निर्धारही यावेळी एकमताने करण्यात आला. जलसंधारण आणि सीएसआर फंडातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्याबाबतही विचारविनिमय व मार्गदर्शन करण्यात आले. किल्ले अजिंक्यतारा येथे श्रमदान करून पहिल्या दुर्ग परिषदेची सांगता झाली.