तरडगाव : फलटण तालुक्यातील तरडगाव येथे कोरोना संक्रमणास अटकाव म्हणून गावातील व्यापारी, सर्व दुकानदार यांची कोरोना तपासणी व त्यानंतर लसीकरण, अशी मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी जवळपास ७५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यातील ३२ जणांना लस देण्यात आली; मात्र आधी तपासणी मग लसीकरण या नियमामुळे व्यापारी वर्गात नाराजी दिसत आहे.
गावात कोरोना बाधितांची संख्या कमी झाली की काही दिवसांनी ती पुन्हा अचानक वाढत आहे. यामुळे गाव वारंवार कोरोना प्रतिबंधित क्षेत्र घोषित होऊन याचा मोठा फटका आर्थिकदृष्ट्या बसत आहे. गेल्या सहा महिन्यांत गाव अनेकदा बंद ठेवावे लागले आहे. गत आठवड्यात व्यावसायिकांनी बंदला विरोध दर्शवित बंद नको, सवलत हवी अशी भूमिका घेतली होती.
परिसरात तरडगाव ही मोठी बाजारपेठ आहे. गावात अनेक छोटे-मोठे व्यावसायिक आहेत. बंदला अनेकदा सामोरे जावे लागल्याने सर्वांचे नुकसान झाले आहे. सध्या गावातील सर्व व्यापाऱ्यांचे लसीकरण लवकर पूर्ण करण्यासाठी नोंदणी सुरू केली गेली आहे. यासाठी अनेकांनी आपली नावे दिली आहेत. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रात नुकतेच कोरोना तपासणीनंतर ३२ जणांना लसीचे डोस देण्यात आले. सर्व व्यापारी वर्गाचे लसीकरण लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कदम यांनी सांगितले.
गावात व्यापारी व दुकानाची संख्या मोठी आहे. आतापर्यंत केवळ २५ टक्केच दुकानदारांचे लसीकरण झाले आहे. काही दुकानांमध्ये तर कुटुंबातीलच अनेक व्यक्ती हे कार्यरत असतात. यामुळे त्या साऱ्यांना लसीकरणाची आवश्यकता आहे. यासाठी योग्य नियोजनातून सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी दक्ष राहून ते पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
(चौकट)
व्यापाऱ्यांमध्ये असंतोष....
लसीकरणासाठी अगोदर कोरोना तपासणी बंधनकारक केल्याने व्यापाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे काहीजण लसीकरण केंद्रावर येण्यास तयार नाहीत. आमच्यामुळेच जर कोरोना संख्या वाढते, असा समज असेल तर यापूर्वीच आम्हाला प्राधान्य देत लसीकरण पूर्ण का केले नाही, असा सवाल केला जात आहे. तसेच पदाधिकारी व अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने आम्हाला योग्य माहिती मिळत नसल्याचे काहींनी सांगितले.
२३तरडगाव
फोटो - तरडगाव (ता. फलटण) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणापूर्वी व्यापाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली.
(छाया : सचिन गायकवाड)