सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा उपाययोजनांची तीव्रता वाढविली आहे. यापुढे कोरोना चाचणी केल्याशिवाय संबंधित व्यक्तीला लस देऊ नये, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार सातारा तहसीलदार यांनी सर्व प्राथिमक आरोग्य केंद्रांना दिले आहेत.जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरी व ग्रामीण भागात पुन्हा एकदा बाधित व मृतांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
कोरोनाचे दिवसाला आठशे ते एक हजार रुग्ण आढळून येत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अजुनही जेमतेच आहे. त्यामुळे संचारंबदीचे निर्बंध कठोर करतानाच जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा उपाययोजनांची तीव्रता वाढवली आहे.आजवर कोरोना चाचणी न करता नागरिकांना कोरोना लस दिली जात होती. मात्र, यापुढे हा प्रकार बंद होणार आहे. लसीकरणापूर्वी नागरिकांची आरटीपीसीआर अथवा रॅट चाचणी करणे प्राथमिक आरोग्य केंद्रांना बंधनकारक करण्यात आले आहे. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला तरच संबंधित व्यक्तीला लसीचा डोस दिला जाणार आहे.
सातारा तहसीलदार यांनी परळी, ठोसेघर, कुमठे, नागठाणे, नांदगाव, चिंचणेर, लिंब, कण्हेर, कस्तुरबा व गोडोली प्राथमिक आरोग्य केंद्रांना तसे आदेश दिले आहेत. प्रशासनाच्या या निर्णयामुळे नव्या कोरोना बाधितांचा शोध घेता येत असला तरी लसीकरणाची गाडी मात्र धिम्या गतीने सुरू झाली आहे.चाचणीत तीघे बाधितसातारा पालिकेच्या कस्तुरबा व गोडोली येथील रुग्णालयात कोरोना चाचणी शिवाय लसीकरण केले जात नाही. गेल्या दोन दिवसांत कस्तुरबा व गोडोली रुग्णालयात मिळून ८७५ रॅट तर ५५३ नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. रॅट चाचणीत तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले असून, आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल अजून आलेला नाही.