सातारा , दि. १८ : दिवाळीच्या पहिल्या अंघोळी दिवशी सकाळी शहरातील बोगदा ते शेंद्रे रस्त्यावर साताराकरांनी मोठी गर्दी केल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे तीन तास या रस्त्यावरील वाहतुकीत विस्कळीतपणा आला होता. परिणामी वाहनधारकांना या गर्दीतून बाहेर पडणेही मुश्कील झाले होते.
दिवाळीच्या पहिल्या अंघोळी दिवशी सातारकर शहराबाहेरील कुरणेश्वर मंदिरात दर्शनासाठी जात असतात. दरवर्षीची ही परंपरा आहे. यावर्षीही बुधवारी सकाळी हजारो सातारकर कुरणेश्वर मंदिराकडे गेले होते. सकाळी सहापासून हे नागरिक कुरणेश्वरकडे जात होते. कोणी पायी तर कोणी वाहनातून गेले होते. मात्र, सकाळी सातनंतर सातारकरांचा ओढा अधिक वाढला. त्यामुळे रस्ताही अपुरा पडू लागला.
बोगद्यापासून कुरणेश्वर मंदिराच्यापुढे शेंद्रेकडे जाणाऱ्या रस्त्यावर नागरिकांची गर्दी दिसून येत होती. यामध्ये ज्येष्ठ होते तसेच तरुण, तरुणी, महिला मोठ्या संख्येने दिसून येत होत्या. त्यातच दोन्ही बाजूंनी वाहने येत होती. त्यातच काही सातारकरांनी आपली वाहने रस्त्याच्या बाजूलाच पार्क करून ठेवली होती.
शेंद्रे बाजूकडून येणारी व बोगद्याकडून जकातवाडी, शेंद्रे, सोनगावकडे जाणारे वाहनधारक या कोंडीत अडकले. या रस्त्यावर सुमारे तीन तास वाहतुकीची कोंडी झाली होती.
या गर्दीमुळे कुरणेश्वरपासून बोगद्यापर्यंत चालत येण्यासाठी बराचवेळ जात होता. तर त्यातच वाहन पुढे नेणे मुश्कील होऊन गेले होते. त्यामुळे वाहनधारकांना सुटका कशी करून घ्यावी? असा प्रश्न पडला होता.
याठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस असलेतरी गर्दी मोठी असल्याने त्यांनाही बराचवेळ वाहतूक कोंडी फोडता आली नाही. सकाळी दहानंतर हळूहळू गर्दी कमी होऊ लागली. त्यानंतर वाहनधारकांची एक-एक करत सुटका झाली.हॉर्नचा कर्णकर्कश आवाज...कुरणेश्वर रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. त्यामध्येच अनेक वाहने अडकून पडली होती. या वाहनधारकांना पुढेही जाता येत नव्हते आणि माघारी फिरता येत नव्हते, अशी स्थिती होती. समोर आणि मागेही गर्दीच गर्दी होती. त्यामुळे हॉर्न वाजवून वाहनधारक गर्दीतून पुढे जाता येते का ते पाहत होते. गर्दीचा कलकलाट तसेच वाहनांचा कणकर्कश आवाज सर्वत्र पसरला होता.