सातारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरण पाच महिन्यांपासून सुरू असले, तरी मोठ्या प्रमाणात लस मिळत नसल्याने मोहीम संथगतीने सुरू आहे. तर आतापर्यंत साडेसहा लाखांहून अधिक नागरिकांना पहिला तर सव्वालाखावर लोकांना कोरोना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे.
जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४५ ते ५९ वर्षांतील कोमॉर्बीड नागरिकांना कोरोना लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस मिळू लागली. त्यासाठी शासकीय आरोग्य केंद्रे आणि खासगी काही रुग्णालयांत ही सुविधा सुरू झाली. तर शासकीय केंद्रात मोफत लस देण्यात येत आहे.
एक मेपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्यात आला. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला; पण ही लसीकरण मोहीम बारगळली. कोरोना लस मिळण्याचे प्रमाण कमी असल्याने शासनानेच शासकीय आरोग्य केंद्रातील लसीकरणाला स्थगिती दिली. तर सातारा जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या ११ लाखांहून अधिक आहे. त्याचबरोबर सवानऊ लाखांवर ४५ वर्षांवरील कोरोना लस लाभार्थी आहेत.
जिल्ह्याला लस उपलब्ध होईल त्याप्रमाणात लसीकरण सुरू आहे. त्यासाठी जिल्ह्यात ५०० हून केंद्रात सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी रोटेशनप्रमाणे नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. त्यामुळे दररोज काही केंद्रेच सुरू असतात. आतापर्यंत जिल्ह्याला कोरोना लसीचे ८ लाख ११ हजार ७० डोस मिळालेले आहेत. त्यातील पहिला डोस ६ लाख ६२ हजार ५३२ नागरिकांना देण्यात आला आहे. तर दुसरा डोस १ लाख ३७ हजार ८२० जणांना मिळाला आहे.
पॉइंटर :
- जिल्ह्याला आतापर्यंत मिळालेले कोरोना लसीचे डोस ८११०७०
- लसीकरण झाले ८००३५२
६० वर्षांवरील नागरिक
- प्रथम डोस २७८३५१
- दुसरा डोस १२३५३३
४५ ते ५९ वयोगट
- पहिला डोस २७५६७१
- दुसरा डोस ३४७१०
१८ ते ४४ वयोगट
- पहिला डोस २७७५२
- दुसरा डोस ५८४१
...............................................................