सातारा : राजवाडा परिसरात गांधी मैदानावर मंगळवारी दिवाळीची पहिली पहाट सुमधूर मराठी व हिंदी गाण्यांनी रंगली. यावेळी रसिक सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अवीट, सुमधूर व एव्हरग्रीन गाण्यांचा आनंद लुटला.
गेली १३ वर्षे सर्व सातारकरांसाठी ऐन दिवाळीत ही अवीट, सुमधूर व एव्हरग्रीन गाणी ऐकण्यासाठी दरवर्षीच हजारो सातारकर गांधी मैदानात हजर असतात. मंगळवारी भल्या पहाटेच या कार्यक्रमासाठी सातारकर मोठ्या उत्साहात उपस्थित होते. ‘केव्हातरी पहाटे’ या कार्यक्रमाची सुरुवात विघ्नहर्त्या गणेशाला वंदन करणाऱ्या ‘तू बुद्धी दे’ या मराठी गीताने गायिका पौर्णिमा व सहकलाकारांनी करत त्यानंतर गीताने गायलेली ‘माझ्या घरी दिवाळी’ हे दिवाळीगीत सादर होऊन कार्यक्रमाचे शीर्षक गीत असलेल्या ‘केव्हातरी पहाटे’ या गाण्याला पुन्हा गायिका पौर्णिमा भावसारने साज चढवला. साताºयाचे स्थानिक सुप्रसिद्ध गायक राजेंद्र घोणे यांच्या ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’ या अभंगानंतर ज्येष्ठ गायक चंद्रकांत शिंदे यांचे ‘स्वरगंगेच्या काठावरती’ हे गीत सादर होऊन पावसाला सुरुवात झाली आणि हा रंगलेला कार्यक्रम मध्येच थांबवावा लागला.
कार्यक्रमामध्ये गायनसाथ पौर्णिमा भावसार, गीता बोधे-भस्मे, राजन घोणे, चंद्र्रकांत शिंदे, मधुराणी मोकल, संतोष वाघ, विवेक जाधव यांची होती तर वादनासाठी सिंथेसायजरवर दीपक सोनावणे, ड्रमसाथ धनंजय कान्हेरे, ढोलकसाथ अनिल खैरनार, तबलासाथ शांताराम दयाळ, गिटारवर चंदू पुट्टा, अॅटोपॅड साथ रोहन मोकल यांची होती. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळ प्रकाश गवळी, निशांत पाटील, गुरुप्रसाद सारडा, अॅड. बाळासाहेब बाबर, सलीम कच्छी, दिलीप गवळी, नरेंद्र पाटील व सातारकर उपस्थित होते.चालक-वाहकांना अभ्यंगस्नानसातारा मध्यवर्ती बसस्थानकात मंगळवारी बाहेर विभागातून मुक्कामी गाडी घेऊन आलेल्या चालक-वाहकांसाठी अभ्यंगस्रानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये त्यांच्या अंघोळीसाठी गरम पाणी, तेल, उठण, साबन देण्यात आली होती. तसेच फराळाचीही सोय केली होती. चालक-वाहक एकमेकांना अंघोळ घालत होते. आपण कुटुंबापासून दूर असल्याची भावना होऊ नये, यासाठी हा उपक्रम आयोजित केला जातो.