सातारा : सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला ईडीने (सक्तवसुली संचालनालय) जरंडेश्वर शुगर मिलला केलेल्या कर्जवाटपाची माहिती शनिवारी मागवली होती. एका बाजूला ही चौकशी सुरू असतानाच नाबार्डने सोमवारी जिल्हा बँकेला उत्कृष्ट कार्यक्षमतेबद्दल बेस्ट परफॉर्मन्स बँक विशेष पुरस्कार देऊन गौरविले आहे, याबाबतची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देशातील राज्य सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची नियंत्रक म्हणून राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) कामकाज करते. या बँकांच्या नियमित बँकिंग कामकाजावर देखरेख ठेवून बँकांच्या प्रगतीचा आढावा घेते. या पुरस्काराचे वितरण ऑनलाईन पद्धतीने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते दि. १२ जुलै रोजी बँकेला करण्यात आले.
जिल्हा बँकांच्या देशाच्या कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासामधील महत्त्वपूर्ण योगदानासाठी नाबार्डने त्यांच्या ४० व्या स्थापना दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा बँकांना पुरस्काराने सन्मानित करण्याचे निश्चित केले होते. याकरिता प्रामुख्याने शेतीसाठी कर्ज पुरवठ्यामधील सहभाग, वंचित घटकांना बँकिंग प्रवाहात समाविष्ट करणे, महिला सक्षमीकरण कामकाज, तंत्रज्ञानाचा अवलंब, बँकांची आर्थिक प्रगती, कर्जवितरण व कर्ज वसुलीमधील सातत्य, उत्कृष्ट नफा क्षमता इत्यादी निकष निश्चित केले होते.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्याच्या कृषी व ग्रामीण विकासासाठी अविरत कार्यरत आहे. बँकेने शेतकरी सभासदांना रुपये ३ लाखापर्यंतचे पीक कर्ज ‘शून्य’ टक्के व्याजदराने ३० लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज ‘शून्य’ टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिले आहे. विकास संस्था सक्षमीकरणासाठी बँक पातळीवर १०० टक्के कर्ज वसुली करणाऱ्या संस्थांना गत ११ वर्षापासून दरवर्षी रुपये २६ हजार ते रुपये २९ हजाराप्रमाणे आजपर्यंत प्रति विकास सेवा सोसायटीस २.८३ लाख रु. वसुली प्रोत्साहन निधी दिलेला आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक अडचण विचारात घेऊन बँकेने शेतकरी ग्रुप मेडिक्लेम इन्शुरन्स पॉलिसी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी बँक आपल्या उत्पन्नातून रु. १२ कोटींपर्यंत विमा हप्ता भरणार आहे. बँकांच्या ठेवीदारांसाठी अद्याप कुठल्याही बँकेने स्वखर्चातून विमा योजना कार्यान्वित केलेली नाही. सातारा जिल्हा बँकेच्या १० लाख बचत ठेव खातेदारांसाठी १ कोटी खर्च करून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे सुरक्षा कवच उपलब्ध करून देणार आहे.
ऑनलाइन पुरस्कार वितरण समारंभास बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने, बँकेचे ज्येष्ठ संचालक व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, संचालक व महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
रिझर्व बँकेच्या निकषानुसारच जरंडेश्वरला कर्जपुरवठा : शिवेंद्रसिंहराजे
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे साखर उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना कर्ज पुरवठा केला जातो. जरंडेश्वर शुगर मिलला देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नाबार्डने घालून दिलेले जे निकष आहेत, त्याप्रमाणेच कर्जपुरवठा केलेला आहे. संबंधित कारखान्याकडून कर्जवसुलीदेखील नियमित होत आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जप्ती याच्याशी जिल्हा बँकेचा काडीमात्र संबंध नाही, असे स्पष्टीकरण आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
जिल्हा बँकेसह आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा आयकार्ड फोटो वापरावा