भोलेनाथ केवटे ।सातारा : लग्न समारंभ म्हणजे दोन जीवांमध्ये आणि दोन कुटुंबांमध्ये जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध प्रस्थापित करणारा एक अविस्मरणीय सोहळा. हा सोहळा पार पडण्यापूर्वी विविध जाती-धर्मात वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आजही पाळल्या जातात. साताऱ्यात नुकत्याच पार पडलेल्या एका विवाहसोळ्यात नवरदेवाच्या हातावर आधी सुईचे चटके मग हळद लावण्यात येते. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आजही सुरू आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण टप्पा असणारा हा क्षण आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देणारा असतो. तसेच काहीजण आपली जुनी परंपरा आहे तशीच टिकवून ठेवतात तर दुसरीकडे आता बदलत्या काळानुरूप अशी काही मंडळीही दिसत आहेत.
सातारा जिल्ह्यात असेही काही समाजबांधव आहेत जे आपली जुनी परंपरा चालू ठेवत आहेत. अशाच एका समाजात लग्न समारंभात नवरदेवाला जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी त्याच्या हाताला सुईने चटके देण्याची परंपरा आजही टिकून आहे.त्यांचं असं म्हणणं आहे की, मुलगा आतापर्यंत कुमार वयात होता. आता तो प्रौढवयात आला आहे. त्याला जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे, याची त्याला आठवण करून देण्यासाठी लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाला चटके हाताला देतात.
नवरदेवासाठी गूळ आणि चपातीचे मिश्रण करून त्याचे पाच ते सात गोळे तयार केले जातात. घरी देवाची पूजा केली जाते. तसेच ज्वारीच्या कांडकीमध्ये एक सुई ठेवली जाते. दिव्यात ती सुई गरम करून लालबुंद केली जाते आणि त्याचे सात चटके नवरदेवाच्या हाताला सर्वांच्या साक्षीने दिले जातात आणि चटका दिल्यावर त्रास होऊ नये म्हणून त्याला गुळाचा आणि चपातीचे मिश्रण केलेला एकेक गोळा खाण्यासाठी देतात.राग निवळण्यासाठी चपाती अन् गूळनवरदेवाला गरम सुईचे चटके देताना त्याला राग येतो, त्यामुळे त्याला राग येऊ नये आणि त्याचा निवळण्यासाठी त्याला चपाती व गूळ खाण्यासाठी देतात. तात्पुरता राग शांत झाला तरी ही आठवण कायमस्वरुपी त्याच्या स्मरणात राहील.नवरदेवाच्या लहान भावालाही चटकेनवरदेवाला सुई गरम करून चटके देताना त्याला लहान भाऊ असेल तर त्यालासुद्धा हे पाच ते सात गरम सुईचे चटके दिले जातात. त्याच्या लग्नावेळी हे चटके नाही दिले तरी चालतात.या गरम सुईचे चटके फक्त नवरदेवालाच आणि त्याला लहान भाऊ असेल तर त्याला देण्यात येतात. नवरीला अशाप्रकारचे चटके देत नाहीत.
आमची ही परंपरा फार पूर्वीपासून चालून आलेली आहे. आजही आम्ही ती चालूच ठेवली आहे. नवरदेवाला आता जबाबदारीची जाणीव करून चटके देण्याची ही प्रथा चालू आहे. काळानुरूप बदलायला हवे. मात्र, आपल्या जुन्या चालत आलेल्या परंपराही जतन केल्या पाहिजेत.-संजय राठोड